सासवड, ता. ८ : येथील चिंतामणी हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी नंदा घाडगे यांनी पार्किंगमध्ये सापडलेली दोन तोळ्यांची सोनसाखळी मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे. त्यांनी दाखवलेल्या या नैतिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नीरा (ता. पुरंदर) येथील रुग्ण ओजश्री गायकवाड यांची शनिवारी (ता. ४) रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये दोन तोळ्यांची सोनसाखळी गहाळ झाली होती. दुसऱ्या दिवशी सफाई करताना नंदा घाडगे यांना ती सापडली. त्यांनी कोणताही मोह न धरता ही साखळी रुग्णालय व्यवस्थापनाकडे जमा केली. दरम्यान, ओजश्री यांनी रुग्णालयाशी संपर्क साधल्यानंतर, खात्री पटवून नंदा यांनी ही साखळी ओजश्रींचे वडील रामचंद्र पवार यांच्याकडे सुपूर्द केली. घाडगे यांच्या या कार्याबद्दल पवार कुटुंबाने त्यांना साडी व रोख रक्कम देऊन सन्मानित केले.