ऐतिहासिक भूमी : तळेगाव ढमढेरे
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला ऐतिहासिक, धार्मिक, क्रांतिकारी व समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांची परंपरा लाभली असून, गावाला अर्धी काशी’ म्हणून ओळखले जाते.
पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक गाव आहे. गावात पुरातन काळातील शेकडो आकर्षक देव- देवतांची मंदिरे असल्याने गावाला प्रती काशीची उपमा दिली जाते.
- नागनाथ शिंगाडे, तळेगाव ढमढेरे
सरदार जयसिंगराव ढमढेरे, बाबाजी ढमढेरे, नानासाहेब फडणीस, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे आदी शूरवीरांची व आजी-माजी सैनिकांची ऐतिहासिक भूमी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे हे गाव आहे. समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी असून, त्यांनी सुरू केलेली मुलींची शाळा येथे आहे. येथे महात्मा फुले यांनी जिवलग सहकारी सत्यशोधक नारायण शिबू कऱ्हेकर यांच्या सहकार्याने येथील सर्व नाभिक बांधवांना एकत्रित करून विधवा महिलांच्या केशवपण विरोधात देशातील पहिला संप घडवून आणला होता. विशेष म्हणजे या ऐतिहासिक संपाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले होते. तसेच, पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह याच गावात घडून आला होता. तळेगाव ढमढेरे येथे महात्मा फुले यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. त्यामुळे या गावाशी महात्मा फुले यांची नाळ जोडली आहे.
पूर्वी गावाला चारही बाजूने तटबंदी होती. येथील सरकारवाडा, पिंगळेवाडा, हनुमान मंदिरासमोरील ऐतिहासिक वेस अद्यापही इतिहासाची साक्ष देत आहे. गावात गणपती मंदिर, शंभू महादेवाची सात चिरंतन मंदिरे, चार संजीवनी समाधी, श्री समर्थ धुंडीनाथ महाराज मठ, देवपुरी मठ, दर्गा तसेच श्रीनाथ मंदिर, भैरवनाथ मंदिर, जामा मशीद, जैन मंदिर, दुर्गादेवी मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, लक्ष्मीदेवी मंदिर, कानिफनाथ मंदिर, दुर्गा माता मंदिर, श्री संत सेना महाराज मंदिर, बुध्द विहार आदी श्रद्धास्थाने आहेत. याशिवाय गावठाणासह वाड्या-वस्त्यांवर शेकडो मंदिरे आहेत. पूर्वीपासून येथे गणेशोत्सव, हनुमान उत्सव, भैरवनाथ उत्सव, श्रीनाथ उत्सव, श्री खंडोबा उत्सव, चंपाषष्ठी, महाशिवरात्री, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्री दत्त जयंती, महावीर जयंती, मोहरम, बकरी ईद आदी धार्मिक उत्सव साजरे केले जातात. यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भूमीला नाथांची पंढरी म्हणूनही संबोधले जाते.
पुढाऱ्यांचे गाव
गावात राजकीय पुढाऱ्यांचे वलय असून महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. पुढाऱ्यांचे गाव म्हणूनही ओळख असल्याने देश, राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांनी या गावाला वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. गावात विविध जाती, धर्म व पंथाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. येथील बाजारपेठ मोठी असून, व्यापारी गाव म्हणूनही वेगळी ओळख आहे. गावात स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, पुरोगामी विचारांचे आणि कला व साहित्य क्षेत्रातील विचारवंत, कायदे तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी, प्शासकीय अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, नोकरदार, दुग्ध व्यावसायिक, कारखानदार, मजूर, महिला व पुरुष बचत गट, महिला मंडळे, विविध तरुण मंडळे, भजनी मंडळे, गणेश मंडळे व प्रतिष्ठाने, बैलगाडा शौकीन, कराटेपटू, गिरीप्रेमी, क्रिकेटप्रेमी आदींची संख्या मोठी आहे. गावची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, शेतीपूरक व्यवसाय आदी क्षेत्रात प्रगती झाली आहे. गावात विविध राजकीय गट असले तरी सार्वजनिक कामांसाठी ग्रामस्थ नेहमी एकत्र येतात.
संस्थांमुळे गावच्या वैभवात भर
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा महात्मा फुले उपबाजार, आठवडा बाजार, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय धान्य गोदाम, दुय्यम निबंधक कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पतसंस्था, पोस्ट ऑफिस, पोलिस दूरक्षेत्र, महावितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बँका, पेट्रोल पंप, गृहप्रकल्प, मंगल कार्यालये, पदवीपर्यंत शिक्षण, विविध शिक्षण संस्था आदींमुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. गावातून बेल्हे- जेजुरी, शिक्रापूर- न्हावरे, अहिल्यानगर- पुणे, अहिल्यानगर- चाकण आदी महत्वाकांक्षी रस्ते जात असल्यामुळे वाहतूक व रहदारीचे जाळे
निर्माण झाले आहे. पुण्याहून तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या बस सेवेची सुविधा उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.