तळेगाव ढमढेरे, ता. ६ : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर-न्हावरा या सुमारे २८ किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रिटच्या ४ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून प्रगतिपथावर असून शनिवारी (ता. ६) तळेगाव ढमढेरे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे प्रशासनाने शांततेच्या मार्गाने हटविली आहेत. येथील दुकानदारांनी पत्र्याची शेड स्वतःहून काढून घेतली आहेत. जेसीबीच्या साह्याने प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील झाडे तोडण्यात आली आहेत.
शिक्रापूर-न्हावरा (क्रमांक ५४१- डी) हा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीटचा राष्ट्रीय महामार्ग केंद्र शासनामार्फत तयार करण्यात येत असून, त्यासाठी ३९६ कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केला आहे. जुलै २०२६ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी चार पदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन झाले असल्याची माहिती नारायणगाव येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे शाखा अभियंता ऋषिकेश हजारे यांनी सांगितली. शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे या मोठ्या लोकसंख्येच्या गावांपैकी शुक्रवार (ता. ५) पासून तळेगाव ढमढेरे येथील रस्ता उकरायला सुरुवात केली आहे. तेथील दोन्ही बाजूच्या अतिक्रमणातील टपऱ्या हलविण्याची नोटीस रस्ता प्रशासनाने संबंधित दुकानदारांना यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार येथील टपरीधारकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणातील टपऱ्या स्वतःहून काढायला सुरुवात केली आहे. तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर या गावातून सध्याच्या रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूने सात-सात मीटर रस्ता खोदून दोन्ही बाजूने चारी खोदण्यात येणार आहे. सुमारे १८ ते २० मीटर रस्त्याची रुंदी राहणार आहे. चार पदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता होणार असून, पदपथाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर यादरम्यानचा रस्ता फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
तळेगाव ढमढेरे येथे अतिक्रमणातील परंतु ग्रामपंचायतीला भाडे देणाऱ्या शेकडो दुकानदारांच्या टपऱ्या बिन बोभाट कसलीही तक्रार न करता दुकानदारांनी काढून घेतल्या आहेत. यामध्ये पोट भाडेकरूंची संख्या जास्त आहे. स्व मालकीची टपरी काही दुकानदारांनी जादा भाडेतत्त्वावर पोट भाडेकरूंना दिली होती. पोट भाडेकरूचे व्यवसाय आता बंद झाल्याने त्यांना आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीतर्फे येथील शासकीय जागेत व्यापार संकुल बांधण्यात येणार असून, त्यासाठी जागा मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे; परंतु अद्याप शासनाने व्यापार संकुल उभारण्यासाठी संबंधित जागेला मंजुरी दिलेली नाही. पोट भाडेकरू मात्र आर्थिक अडचणीत अडकले आहेत. व्यवसाय बंद झाल्याने ग्रामपंचायतीने भाडेकरूंची व्यवस्था करावी अशी अपेक्षा संबंधित दुकानदारांनी व्यक्त केली आहे.
रस्त्यांचे जाळे
तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर या दोन्ही गावांना विविध रस्त्यांचे जाळे जोडण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे गावातून न्हावरा-शिक्रापूर, अहिल्यानगर-पुणे (बाह्यवळण रस्ता), बेल्हा-जेजुरी हे राष्ट्रीय महामार्ग जात असून गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नुकसान भरपाई प्रक्रिया
न्हावरा ते घोलपवाडी पर्यंत रस्त्यासाठी झालेल्या भूसंपादनाची नुकसानभरपाई पूर्ण झाली असून, उर्वरित काही तक्रारी संदर्भात नुकसान भरपाई विषयी सुसंवाद सुरू आहे. घोलपवाडी पर्यंत रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून पुलाची कामेही बहुतांश ठिकाणी झाली आहेत. रस्त्यावरील टाकळीभिमा, शिवतक्रार म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी, उरळगाव या गावातील भूसंपादन व नुकसान भरपाई बहुतांश पूर्ण झाले आहे. न्हावरा, कासारी, निमगाव म्हाळुंगी, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर येथील भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. गरज असेल तेथेच भूसंपादन करण्यात येत आहे. न्हावरा ते घोलपवाडी पर्यंत संपूर्ण रस्ता उकरला असून रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. ज्या ठिकाणी रस्त्यासाठी अडचण निर्माण झाली आहे तेथील प्रश्न जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासन यांच्या समन्वयातून सोडवण्यात येणार आहेत.
लहान ५८ पूल असणार
न्हावरा ते शिक्रापूर या चार पदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूने साइडपट्ट्या व चारी असून, न्हावरा, माळवाडी- कासारी, शिक्रापूर येथे ५ मोठे
पूल असणार आहेत. तर रस्त्यावर विविध ठिकाणी लहान ५८ पूल असणार आहेत. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक असून, दोन्ही बाजूने २-२ लेन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची असणार आहे.
न्हावरा ते शिक्रापूर या २८ किलोमीटरच्या ४ पदरी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी जास्त अडचणी आल्या नाहीत. नागरिकांनी हा महत्त्वाकांक्षी रस्ता लवकर तयार होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करून रस्त्याची गुणवत्ता व दर्जा उत्कृष्ट राखला जाईल.
- ऋषिकेश हजारे, शाखा अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.