टाकळी हाजी, ता. १७ : टाकळी हाजी व परिसरात ऐन पावसाळ्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच राहिल्याने शेतकरी व पालक वर्गात प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. घोडकुकडी पट्ट्यातील बेट भागात दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
सध्या खरिपातील बाजरी काढणी व उसामध्ये तणनाशक फवारणीची कामे सुरू आहेत. मात्र बिबट्यांच्या धास्तीमुळे महिला शेतकऱ्यांना एकट्याने शेतात जाणे टाळावे लागत आहे.
सोमवारी रात्री (ता. १५) टाकळी हाजी (उचाळेवस्ती) येथे समाबाई कांदळकर यांच्या दारापर्यंत बिबट्या मांजरीचा पाठलाग करीत गेला. त्यांनी दरवाजा वेळेवर बंद केला नसता तर बिबट्याने घरात प्रवेश करून हल्ला केला असता. मागील आठवड्यात पिंपरखेड येथे शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने झडप घातली होती, मात्र त्या थोडक्यात बचावल्या. त्याचबरोबर दुडेवाडी (निमगाव दुडे) येथे चार दिवसांपूर्वी शेळीवर हल्ला करून ती फस्त केली होती.
दररोज कुठेतरी बिबट्याचे हल्ले होत असल्याने पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांची नसबंदी करून वाढती संख्या रोखणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी करत आहेत. वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावले असले तरी बिबटे त्यामध्ये अडकत नसल्याने अधिकारी हतबल झाले आहेत. तसेच फिरत्या वाहनातून प्रबोधन केले जात असूनही हल्ल्यांचा धोका कायम आहे.
वाडी वस्तीतून येणारे शाळकरी विद्यार्थी, शेतात काम करणारे मजूर यांना बिबट्याची मोठी भीती असून, बिबट्यांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर कायमस्वरूपी नसबंदी सारख्या उपाययोजना कराव्यात. शासनाने घर व शेतीसाठी संरक्षण तार कुंपणाची मनरेगा अंतर्गत विशेष योजना बिबट प्रवण क्षेत्रातील तालुक्यात सुरू करावी. त्यामुळे हल्ले रोखण्यास मदत होईल.
- राजेंद्र गावडे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.