सुनील जगताप : सकाळ वृत्तसेवा
उरुळी कांचन, ता. १८ : येथील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ७९.५३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना २०२२ साली मंजूर झालेली आहे. पण या पाणीपुरवठा योजनेचे काम अडथळ्यांची शर्यत खेळत अतिशय संथ गतीने सुरू आहे. ग्रामपंचायतीचे १७ सदस्य आहेत; पण त्यापैकी माजी सरपंच भाऊसाहेब कांचन सोडले तर या योजनेची फारशी माहिती कोणत्याच सदस्याला नाही हे पण गावाचे दुर्भाग्य आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) गावाची लोकसंख्या शासन दरबारी कागदावर २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ३० हजार ५०० आहे. पण प्रत्यक्षात ६० ते ७० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असून पूर्व हवेली तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाची बाजारपेठ असलेले हे गाव आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत सोई पासून वंचित आहे. उरुळी कांचन हे गाव पिण्याच्या पाण्यासाठी केवळ आणि केवळ मुळा-मुठा उजवा कालव्याच्या पाण्यावरच अवलंबून. कालव्याला पाणी नसले की उरुळी कांचनला पाणीटंचाई सुरू झालीच हे समीकरण. या गावासाठी कोणताही हक्काचा पाणी स्रोत उपलब्ध नसल्याने टंचाईच्या काळात या गावातील जनतेला नाइलाजाने जवळपास ५०० ते ५५० टीडीएस असलेल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागतोय. जो टीडीएस सर्वसाधारण ७० ते ७५ लागतो. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो ही आजची वास्तव स्थिती आहे. राजकीय सुंदोपसुंदीत या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या प्रस्तावांना तत्कालीन परिस्थितीनुसार निधीसह मंजुरी मिळून देखील, केवळ श्रेय वादामुळे त्या योजना शेवटपर्यंत सुरू झाल्याच नाहीत ही पण खरी शोकांतिका आहे. दरम्यान, गावाला हक्काची जागा नसल्याने पाणीपुरवठा योजनेला देवस्थान संस्थेच्या जागेवर अवलंबून राहावे लागले आहे.
या कामाची सुरुवात करण्यासाठी ठेकेदाराला २७ जुलै २०२२ला वर्क ऑर्डर दिलेली आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत ३० महिन्यांची होती; मात्र अद्यापपर्यंत या योजनेचे केवळ ७० टक्के काम पूर्ण झाले असल्याने उरलेल्या ३० टक्के कामासाठी आणखी एक वर्ष कालावधी लागेल.
- इखलास शेख, अभियंता, जलजीवन मिशन
योजना स्वरूप (रक्कम रुपयांत)
योजनेची किंमत : ७९.५३ कोटी
निविदेची किंमत : ५५.७६ कोटी
वर्कऑर्डर : ता. २७ जुलै २०२२
काम पूर्ण करण्याची मुदत : ३० महिने (मुदत वाढ प्रस्ताव सादर)
ठेकेदार : मे. आर. बी. कृष्णानी
योजनेचे सद्यःस्थिती
भौतिक प्रगती ७० टक्के
पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी : डिसेंबर २०२६
पाणीसाठा : २३३ दशलक्ष लिटर
दररोज गावाला : २५ लाख लिटर पाण्याची गरज
उंच साठवण टाकीचे ठिकाण***क्षमता (लक्षलिटरमध्ये)
इंदिरानगर***२.२२
पांढरस्थळ***२.८१
इरिगेशन कॉलनी***३.९१
जलशुद्धीकरण केंद्राशेजारी मुख्य संतुलन टाकी***२.६०
व्यवस्था
पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता : ३.५ दशलक्ष लिटर
वितरण व्यवस्थेची एचडीपी पाइप व्यास (७५ ते ३०० मीमी)
एकूण ६४.४५ किमीद्वारे पाणीपुरवठा योग्य दाबाने सर्व ठिकाणी केला जाणार
ठेकेदाराची जबाबदारी, हस्तांतरण
योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने ठेकेदाराच्या सर्व खर्चाने व पुढील नऊ महिने ग्रामपंचायतीसोबत समन्वय साधून अशी एकूण एक वर्षाची पूर्ण जबाबदारी ठेकेदाराची असेल. योजनेचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर व सर्व ठिकाणी योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरच ग्रामपंचायतीच्या ताब्यात योजना देण्यात येईल. सन २०५४ साठीची लोकसंख्या ६९४९४ एवढ्या लोकसंख्येच्या विचार करून आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
२०११ नंतर जनगणना झाली नसल्यामुळे २०५४ ची लोकसंख्या ६९४९४ इतकी गृहीत धरून योजनेचा आराखडा तयार केला असल्याने तो सध्याच्याच अनधिकृत लोकसंख्येला पुरेसा नाही तर भविष्यात नेमके काय होणार?
- डॉ.बापूसाहेब धुमाणे, स्थानिक रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.