उरुळी कांचन, ता. ४ : मुळा-मुठा नदीपात्रात अवैधरीत्या टाकला जाणारा कचरा आणि त्यामुळे लागणाऱ्या आगींमुळे निर्माण झालेल्या आरोग्य संकटाविरोधात आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एडीटी) शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. ४) प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. कचरा टाकणे तातडीने बंद न झाल्यास कचऱ्याचे ट्रॅक्टर अडविण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनासह स्थानिक पोलिसांनाही याबाबत निवेदन दिले.
लोणी काळभोर येथील नदीपात्रात दररोज ३५ ते ४० ट्रॅक्टर कचरा विनाप्रक्रिया टाकला जातो. २६ फेब्रुवारी २०२४ ला या कचऱ्याला लागलेली आग पाच दिवस धुमसत होती. यातून निर्माण झालेल्या विषारी धुरामुळे विद्यापीठातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. दरम्यान, नदीपात्रात टाकलेल्या कचऱ्याला लागलेली आग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) एकमेव बंब आणि एमआयटी एडीटी विद्यापीठातील २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी पाच दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करून मंगळवारी (ता. २) आग आटोक्यात आणली; मात्र लागलेल्या या आगीमुळे चार दिवस परिसरात विषारी धुराचे प्रचंड लोट जमा झाले. यामुळे वसतिगृहातील तसेच परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे, घसा बसणे आदी त्रास झाला. एमआयटी शैक्षणिक संकुलात सध्या राज्यासह देश-विदेशातून आलेले जवळपास २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास ५ हजार विद्यार्थी व १ हजार कर्मचारी शैक्षणिक संकुलाच्या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या गंभीर विषयाची दखल घेत, तातडीने नदीपात्रात कचरा टाकणे थांबवावे, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
मुळा-मुठा नदीपात्रात थेट टाकला जाणारा कचरा, त्याला सातत्याने लागणाऱ्या आगी, त्यातून निघणारा प्रचंड विषारी धूर आणि त्यामुळे होणारा श्वसनाचा त्रास या घटनांबाबत एमआयटी एडीटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी तीव्र भूमिका घेत विद्यापीठातून नदीकडे जाणारे कचऱ्याचे सर्व ट्रॅक्टर पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने प्रवेशद्वारावरच आडविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून स्थानिक ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी.
- डॉ. महेश चोपडे, कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी काळभोर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.