उरुळी कांचन, ता. ९ : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हवेली पंचायत समिती अपक्ष उमेदवाराच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली असून, सभापतिपदी युवराज हिरामण काकडे; तर उपसभापतिपदी अपक्ष सदस्या विद्या दत्तात्रेय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
हवेली पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता. ९) उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये सभापतिपदासाठी युवराज काकडे, तर उपसभापतिपदासाठी एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी पंचायत समिती सदस्य मनोज चौधरी, कोमल कांबळे, सुषमा मुरकुटे, अमोल टेकाळे, युवराज वांजळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी ७ सदस्यांची गरज होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर, भाजपने ४, तर शिवसेना व अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. यामध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला केवळ एक जागेची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका व राजकीय हालचालींना वेग आला होता. अखेर अपक्ष सदस्या विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला. त्यांमुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ ७ वर पोहोचले आणि हवेली पंचायत समितीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपली सत्ता प्रस्थापित केली.
नवनिर्वाचित सभापती युवराज काकडे म्हणाले, ‘‘तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेत ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन काम केले जाईल. तालुक्यामधील गावागावातील रस्ते, पाणीपुरवठा यांसमवेत तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा पुरविणे यावर विशेष भर देत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील.’’ उपसभापती विद्या गायकवाड यांनी देखील सभागृहातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने तालुक्यातील नागरिकांच्या महत्त्वाचे प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.