उरुळी कांचन, ता. ११ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मुळा-मुठा नदीपात्रातील कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आगामी दोन महिन्यांत आधुनिक प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, त्यातून होणारे प्रदूषण आणि वारंवार लागणाऱ्या आगीमुळे नागरिक व ‘एमआयटी’ विद्यापीठाचे विद्यार्थी त्रस्त होते. यावर उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यात लोणी काळभोरमधील गट क्रमांक ११३ मधील ७.३४ हेक्टर सरकारी जमीन प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. केसनंदच्या धर्तीवर येथे कचरा वर्गीकरण व प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पामुळे कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत आणि एमआयटी शैक्षणिक संकुल संयुक्तपणे काम करणार असून, एमआयटीमार्फत ''‘सीएसआर’'' निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या बैठकीस हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, एमआयटी शिक्षण समूहाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कुलगुरू महेश चोपडे, लोणी काळभोरचे सरपंच तथा प्रशासक नागेश काळभोर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड तसेच दोन्ही ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे परिसरातील कचरा प्रश्नाला पूर्णविराम मिळेल. तसेच, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पुढाकाराने महामार्गालगत २५ ते ३० गावांच्या फायद्यासाठी एक मोठा प्रकल्प वर्षभरात उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.
- प्रशांत काळभोर, संचालक, पुणे बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.