उंडवडी, ता. १९ : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथील शेतकरी राजेंद्र दादासाहेब चांदगुडे यांच्या विहीरीवर बसविलेल्या सौर पॅनेलची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे. या प्रकारामुळे त्यांच्या पिकांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला असून, मोठे आर्थिक नुकसान उभे ठाकले आहे.
शेतकरी राजेंद्र चांदगुडे यांच्या गट नं. १६७ मधील अडीच एकर क्षेत्रात विहीर असून, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सौर ऊर्जा पंप बसविण्यात आला होता. याच पंपाच्या साहाय्याने मका व कडवळ या पिकांना पाणी दिले जात होते. मात्र, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अज्ञातांनी दोन सौर प्लेटा दगडाने फोडून केबल तोडून टाकल्याने संपूर्ण यंत्रणा निकामी झाली आहे.
सध्या त्यांच्या शेतात अर्धा एकर ऊस असून, तो साडेचार महिन्यांचा झाला आहे. पाण्याअभावी पिकाची वाढ थांबली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक जळण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणी चांदगुडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. महावितरणकडे संपर्क साधल्यावर मेढा प्रकरणात अर्ज केलेला असल्याने तिकडे पाठपुरावा करा, असा सल्ला मिळाल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.
सौर ऊर्जा बसविणारी अक्षया सोलर पॉवर प्रा. लि. ही कंपनी दुरुस्तीबाबत हात टेकत असून, दुरुस्ती स्वखर्चाने करावी लागेल, असा त्यांचा स्पष्ट शब्दात पवित्रा आहे. पुढील पाठपुराव्यानंतरच त्यांनी टाटा एआयजी (AIG) विमा कंपनीकडे दावा पाठविल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कंपनीचे प्रतिनिधी किंवा विमा अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली नाही.
तोडफोड झालेल्या पंपाच्या दुरुस्तीला तब्बल एक लाख रुपये खर्च येणार असून, हा खर्च करणे आमच्या ऐपतीबाहेर आहे. त्यामुळे संबंधित कंपनी आणि विमा कंपनीने तातडीने दुरुस्ती करून न्याय द्यावा.
- राजेंद्र चांदगुडे, शेतकरी
03137