उरुळी कांचन, ता. ३१ : सुनेविरोधात कोर्टातून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष दाखवून वयोवृद्ध शेतकऱ्याकडून सुमारे ६ लाख रुपये लुटणाऱ्या स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) या बोगस महिला वकिलाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी कडू बाबुराव सातपुते (वय ६३, रा. दहिगाव माळी गल्ली, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कडू सातपुते यांचा मुलगा आणि सुनेची नेहमी भांडणे होत होती. त्यामुळे फिर्यादी यांना त्यांच्या मुलासाठी सुनेकडून सोडचिठ्ठी करून घ्यायची होती. त्यामुळे फिर्यादी सातपुते हे आरोपी स्नेहल कांबळे यांना या संदर्भात भेटले. त्यांच्या अशिक्षित व अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन स्नेहल कांबळे हिने वकील असल्याची खोटी बतावणी करून सुनेविरोधात कोर्टातून सोडचिठ्ठी देण्याचे आमिष दाखविले. त्यातून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रोख व बँक खात्यावर पैसे घेतले. मात्र, सोडचिठ्ठी करून दिली नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादी सातपुते यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या गाळ्यांच्या परिसरात सापळा रचून सातपुते यांच्याकडून १५ हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना स्नेहल कांबळे यांना पकडले. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कांबळे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पूजा माळी, पोलिस हवालदार ज्योती नवले, पोलिस अंमलदार अजिंक्य जोजारे, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
अटकेच्या भीतीने उकळले पैसे
आरोपी स्नेहल कांबळे हिने कडू सातपुते यांना त्यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेने महिला आयोगाकडे तक्रार केली असून, त्यांच्या विरोधात बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे, असे खोटे कारणं सांगून त्यांच्याकडून पोलिस व कोर्ट कर्मचारी यांना पैसे द्यावे लागतील, नाहीतर त्यांना अटक होईल, अशी खोटी माहिती दिली. त्यांना वेळोवेळी अटकेची भीती दाखवून ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण ५ लाख ९४ हजार ६० रुपये रक्कम खंडणी स्वरूपात स्वीकारली आहे. सदरचा प्रकार हा २४ एप्रिल २०२५ ते २८ मे २०२५ या कालावधीत घडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.