उरुळी कांचन, ता. १३ : पूर्व हवेलीतील एकूण चार गटांपैकी तीन गट महिला उमेदवारांसाठी आरक्षित केले आहेत. त्यामुळे महिलांना राजकारणात संधी मिळत असताना अनेक अनुभवी व इच्छुक पुरुष उमेदवारांची राजकीय समीकरणे कोलमडल्याचे चित्र आहे.
या भागातील उरुळी कांचन- सोरतापवाडी, थेऊर- आव्हाळवाडी, लोणी काळभोर- कदमवाकवस्ती आणि कोरेगावमूळ- केसनंद हे चार गट आहेत. आरक्षणानुसार उरुळी कांचन- सोरतापवाडी गट अनुसूचित जातीसाठी, तर उर्वरित तीन गट महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे तीन महिलांना जिल्हा परिषदेत संधी मिळणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
आरक्षण जाहीर होण्याआधीच अनेक इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली होती. काहींनी तर सोशल मीडियावर ‘भावी जिल्हा परिषद सदस्य’ म्हणून पोस्ट व्हायरल केल्या होत्या. मात्र, सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यापासून त्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे प्रबळ उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
उरुळी कांचन - सोरतापवाडी गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने या गटातून माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर व सामाजिक कार्यकर्ते जीवन शिंदे यांची नावे चर्चेत आली आहेत. तर, इतर तीन गटांमध्ये वाडेबोल्हाई येथील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी (शरद पवार गट) सुरेखा भोरडे, केसनंदच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा हरगुडे, अष्टापूर ग्रामपंचायत माजी सरपंच कविता जगताप, कोरेगावमूळ समाजसेविका संगीता शितोळे या महिलांची नावे चर्चेत आहेत.
गटनिहाय व आरक्षण : उरुळी कांचन- सोरतापवाडी- अनुसूचित जाती, थेऊर- आव्हाळवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
लोणी काळभोर- कदमवाकवस्ती- अनुसूचित जाती महिला, कोरेगावमूळ- केसनंद- सर्वसाधारण महिला.