उरुळी कांचन, ता. १४ : गेली सहा दशके उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील नागरिकांना सकाळच्या ताज्या बातम्यांचे दालन उघडणाऱ्या रजनी मधुकर धर्माधिकारी या आजही वयाच्या ७५व्या वर्षी तितक्याच जोमाने आपली सेवा अविरतपणे सुरू ठेवून आहेत. आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी वृत्तपत्र वितरण व्यवसायात अतुलनीय योगदान दिले आहे.
वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय त्यांनी केवळ एक रोजगार म्हणून नाही, तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारला. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांचा विवाह मधुकर रामचंद्र धर्माधिकारी यांच्याशी झाला. तेव्हापासून या व्यवसायाशी त्यांचे नाते दृढ झाले. पतीनंतर हा वारसा त्यांनी एकहाती पुढे नेत परिसरातील वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोचवण्याचा विडा उचलला.
पहाटे चार वाजता उठून वृत्तपत्रांची गोळाबेरीज, त्यानंतर त्यांचे योग्य नियोजन करून वेळेत वाचकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्या अत्यंत शिस्तबद्धतेने पार पाडतात. त्यांच्या या कार्यात त्यांचे बंधू संतोष अम्मणगी हे देखील मोलाची साथ देतात. सध्या त्यांच्याकडे दोन वितरक कार्यरत असून, दररोज मोठ्या प्रमाणावर वृत्तपत्र विक्री त्यांच्या दुकानातून केली जाते.
रजनी धर्माधिकारी यांनी सांगितले की, ‘‘कोरोना काळात वृत्तपत्र क्षेत्रालाही मोठा आर्थिक फटका बसला. दोन ते तीन लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. वृत्तपत्रांचा खप निम्म्यावर आला. तरीसुद्धा जिद्द न सोडता पुन्हा नव्याने उभं राहिलो. वसुली करताना अनेक अडचणी येतात. लोक पैसे वेळेवर देत नाहीत, त्यामुळे आमचे आर्थिक गणित कोलमडते. सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी निवृत्ती वेतन योजना सुरू करावी.’’
03413