उत्रौली, ता. ३१ : वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी (ता. भोर) येथील किल्ले रोहिडेश्वरच्या चारही बाजूंना जाळ रेषा काढण्याचे काम भोर वनविभागाच्या वतीने गेले चार दिवस सुरू आहे.
डोंगर परिसरातील वाळलेले गवत, वनस्पती, पालापाचोळ्याला वणवे लागल्याने अनेकदा संपूर्ण डोंगर, जंगले जळून खाक होतात. यामुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेकदा पशु- पक्षी, वन्यप्राणी होरपळून जातात. त्यामुळे वणवे नियंत्रणासाठी भोर येथील रोहिडा डोंगर परिसरामध्ये वनविभागाच्या वतीने जाळरेषा तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
वणवे लागल्यामुळे रोहिडा किल्ला परिसरातील डोंगररांगामध्ये पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. वन्यजीवांचे हाल होतात. डोंगर परिसरामध्ये वन विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. या रोपांचे रक्षण व्हावे, परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या आगीचा या रोपट्यांवर परिणाम होऊ नये, यासाठी वन विभागाच्या वतीने जाळरेषा काढण्यात येत आहे.
या कामासाठी भोर सहाय्यक वन संरक्षक शीतल राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुग्रीव मुंडे, वनरक्षक के. एम. हिमोणे, हंगामी वनसेवक गणेश बोडरे, अविनाश चव्हाण, संपत बोडरे, धैर्यशील चव्हाण, साहिल चव्हाण सहभागी झाले होते. रोहिडा किल्ला परिसरामधील वनक्षेत्रात नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वनपाल सुग्रीव मुंडे यांनी केले आहे.
00117