वरवंड, ता. १९ : बोरीपार्धी (ता. दौंड) येथे बिबट्याच्या हल्ल्यात विष्णू मोरे या लहान बाळाच्या मृत्यूच्या घटनेनंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चक्क चोवीस तासात बिबट्या जेरबंद झाला. या घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन वनविभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे बिबट्या पकडण्यात यश आल्याने नागरीकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
बोरीपार्धी येथे रविवारी (ता. १७) सायंकाळी बाळासाहेब टेंगले यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू होती. मजुर करण मोरे हे पत्नीसह ऊसतोड करीत होते. त्यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झोळीत टाकलेल्या तीन महिन्याच्या मुलावर झडप घातली. गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारानंतर मृत्यू झाला. मागील सहा महिन्यापांसून या भागात बिबट्याचे वास्तव्य होते. बिबट्याला पकडण्याची मागणी होती. अखेर मुलाच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंवरक्षक महादेव मोहीते व पुणे सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर संबंधित रेस्क्यू व दौंड वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना आवश्यक सूचना केल्या.
बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पाच पिंजरे लावले. तसेच थर्मल ड्रोन उडवून उसाच्या शेतात बिबट्याचा शोध घेतला. मात्र, बिबट्या नजरेस पडला नाही. त्यामुळे बिबट्या पिंजऱ्यात सापडणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सोमवारी (ता. १८) बाळावर हल्ला केलेल्या ठिकाणीच लावलेल्या पिंजऱ्यातील भक्षाच्या ओढीने बिबट्या आला. आत जाताच पिंजऱ्याचा दरवाजा बंद झाला. काही अंतरावर असलेले रेस्क्यू पथक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याच्या ठिकाणी धाव घेत त्याला पुणे येथील रेस्क्यू वन्यप्राणी केंद्रात दाखल केले.
पुणे प्रादेशिक वनविभागाचे मुख्यवनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक महादेव मोहीते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल योगिता नायकवाडी-वीर, अंकुश खरात, शीतल मेरगळ, रेस्क्यू पथक प्रमुख नचिकेत अवधानी, अक्षय शितोळे, गणेश मस्के, ज्ञानदेव भोंडवे, शिवकुमार बोंबले यांनी हे कार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.