वरवंड, ता. ६ : वरवंड (ता. दौंड) येथे भंगार गोळा करणाऱ्या परप्रांतीय व्यवसायिकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. ६) सकाळी ८ वाजता उघडकीस आला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने हा खून केला असून, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शैलेंद्रकुमार विमल (वय ३२, मुळगाव उत्तर प्रदेश, सध्या रा. वरवंड), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पाटस पोलिसांनी माहिती दिली की, शैलेंद्रकुमार विमल हे कुटुंबासमवेत मागील पंधरा वर्षापासून वरवंड येथे राहत
आहे. त्यांचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय आहे. मंगळवारी (ता. ५) सकाळी ते नेहमीप्रमाणे भंगार गोळा करण्यासाठी
घराबाहेर पडले. सायकांळी ते घरी येऊन पुन्हा भंगार गोळा करण्यासाठी बाहेर गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने मोबाईलवर त्यांना संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर पत्नी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क साधत होती. मात्र, ते रात्री घरी आले नाही. सकाळी पुणे- सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या एका मोकळ्या शेतात शैलेंद्र यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांचा चेहरा दगडाने ठेचून त्यांचा खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.
नागरीकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेता दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस,पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे, पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख हे पोलिस पथकासह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेहाची व परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी ठसेतज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले होती. शैलेंद्रकुमार विमल यांच्या फिर्यादी वरून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.