अमर परदेशी, सकाळ वृत्तसेवा
वरवंड, ता. ८ ः दौंड तालुक्यात सध्या बिबट्यांची वाढती संख्या, उपद्रव व अधिवासामुळे नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच यंदाचा साखर कारखान्यांचा गळीप हंगाम तोंडावर आला आहे. बिबट्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिक, पशुधनाबरोबर आता ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाला मोठे आवाहन राहणार आहे.
यंदा वनविभागाला ठोस उपाययोजना करून एखादे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. तरच मजुरांसाठी यंदाचा ऊसतोड हंगाम निर्विघ्न पार पडेल. पुणे प्रादेशिक वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या दौंड तालुक्यात बिबट संकट वाढले आहे. तालुका वनपरिक्षेत्रातील यवत, वरवंड व दौंड वनपरिमंडल कार्यक्षेत्रात सुमारे ४५ पेक्षा जास्त बिबट्यांचा अधिवास स्पष्ट आहे. या बिबट्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. बहुतांश शेतातच पाळीव जनावरांचे गोठे असल्याने अनेक गोठ्यांना सुरक्षा कुंपण नाहीत. बिबट्यांचे दबा धरून पशुधनावर हल्ले सुरू आहेत. वनविभागाच्या वतीने पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक नुकसान भरपाई दिली जाते. तसेच, जनजागृतीवर भर दिला जात आहे. मात्र, याचा बिबट व मानव संघर्ष रोखण्यावर फारसा अनुकूल फरक पडताना दिसत नाही.
मागील वर्षी बोरीपार्धी हद्दीत ऊसतोड सुरू असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मजुराच्या लहान मुलावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेनंतर नागरिकांनी वनविभागाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला होता. तसेच, इतर ठिकाणीही ऊसतोडी दरम्यान मजुरांना बिबट्याचे बछडे व मादी किंवा नराचे दर्शन घडले. काही ठिकाणी तर बिबट्यामुळे ऊसतोडणी बंद करावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर यंदा वनविभागाला मजुरांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने कंबर कसावी लागणार आहे. दौंड तालुक्यात भीमा पाटस, दौंड शुगर, श्रीनाथ मस्कोबा, अनुराज शुगर या चारही साखर कारखान्यांबरोबर इतर तालुक्यातील नामवंत साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी देखील सुरू होणार आहेत. त्यातच गुऱ्हाळांसाठीही ऊसतोडणी सुरू असणार आहे.
बिबटबाबत जनजागृतीची गरज
दौंड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वनपरिमंडल कार्यक्षेत्रातील संबंधित साखर कारखान्यावर जाऊन छावण्यांवरील मजुरांच्या भेटी घेऊन बिबटबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. शिवाय ऊसतोडणीवेळी मजुरांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना जाळी किंवा एखादे सोलर झटका मशिन वाटप करणे, मोठ्या आवाजासाठी एखादा स्पीकर देणे, बॅटरी, काठ्या आदी वाटप करणे गरजेचे आहे. शिवाय ऊसतोडणी कालावधीत शिवारात फिरण्यासाठी किंबहुना गस्तीचे एक वनपथकाची नेमणूक करणे, आदी उपाययोजना कराव्या लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.