वरवंड, ता. ३० : वरवंड (ता. दौंड) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी येथील शेरीचा मळा भागात शुक्रवारी (ता. ३०) मध्यरात्री एका घरात प्रवेश करून घरातील दोघांना बेदम मारहाण करून तीन तोळे सोन्याचे दागिने, १३ हजार रुपये रोकड तसेच दोन मोबाइल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत जनार्दन नाना दिवेकर (रा. वरवंड ता. दौंड) यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र फणसे यांनी माहिती दिली. फिर्यादी जनार्दन दिवेकर यांचे वरवंड-कानगाव रस्त्यालगत शेरीचामळा भागात घर आहे. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी शिताफीने घराचा दरवाजा उघडला. कपाट उघडून साहित्य इतरत्र फेकून दिले. यावेळी कपाटातील तेरा हजार रुपये रोकड चोरट्यांनी काढून घेतली. बाजूलाच त्यांच्या पत्नी सोनाली दिवेकर झोपल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर बॅटरीचा उजेड टाकून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसकावला. यावेळी सोनाली यांना जाग आली.अनोळखी व्यक्तींना पाहून त्यांनी घाबरून आरडाओरडा केला .मात्र,चोरट्यांनी हातातील लोखंडी गजाने सोनाली यांना मारहाण केली. आवाज ऐकून दुसऱ्या खोलीत झोपलेले जनार्दन यांना जाग आली. चोरट्यांनी त्यांनाही गजाने बेदम मारहाण केली. त्यांनतर चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचा दागिना, रोख १३ हजार व दोन मोबाइल घेऊन पळ काढला.
दिवेकर यांनी आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी यांच्या घरी धाव घेतली. झालेल्या घटनेबाबत त्यांनी नागरिकांना सांगितले. त्यानंतर पोलिस पाटील किशोर दिवेकर यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत चोरीच्या घटने संदर्भात गावातील ग्रामस्थांना मोबाइलद्वारे संदेश दिला. माहिती मिळताच पाटस पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने, पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी घरालगत असणाऱ्या उसाच्या शेतात चोरट्यांच्या पाऊलखुणा दिसून आल्या.
दिवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस चौकीमध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.