पुणे

समृद्ध, सक्षम आणि मूल्याधिष्ठित मावळ

CD

संजय वसंत जगताप, जिल्हा परिषद शाळा, ब्राह्मणवाडी (बौर) मावळ

प्राथमिक-माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, एमआयडीसीच्या पार्श्वभूमीवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, वैद्यकीय-निमवैद्यकीय संस्था, व्यवसाय विकास व व्यवस्थापन अभ्यासक्रम यामुळे मावळ ‘शैक्षणिक हब’ म्हणून उदयास आले आहे. अनेक संगणक साक्षर शिक्षक ई-लर्निंग वेबसाईट व अॅपस् बनवत आहेत. नवीन अभ्यासक्रम, प्रशिक्षणही आता ऑनलाईन झाले आहे. भविष्यात लवकरच ‘डिजिटल क्लासरूम’ ही संकल्पना मावळमधील अनेक शाळांमधून साकारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकाच्या मनात आणि प्रत्येक बालकाच्या डोळ्यांत ‘शैक्षणिक व्हिजन : समृद्ध, सक्षम आणि मूल्याधिष्ठित मावळ’ हे एकच ध्येय तरळू लागले आहे.
------------------------
स ह्याद्रीच्या कुशीत पसरलेला मावळ तालुका केवळ निसर्गरम्य दृश्यांनी सजलेला भूभाग नाही; तो इतिहास, परंपरा, कृषी संस्कृती, उद्योजकता आणि आधुनिक परिवर्तन यांचा अस्सल संगम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पावन पदस्पर्श झालेले किल्ले, लहान-मोठी धरणे आणि नदी- नाल्यांची ही भूमी आज शिक्षणाच्या क्षेत्रात नवे भविष्य घडविण्याच्या संकल्पाने उजळली आहे. शिक्षण म्हणजे केवळ विषयांचे आकलन नव्हे; तर भविष्याची बीजे पेरण्याची पवित्र प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत मावळने अलीकडच्या काळात झपाट्याने प्रगत केली असून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या भूमीतील गावोगावी उगवणारा बदल केवळ पायाभूत सुविधांमध्येच नाही; तर विचारसरणी, दृष्टिकोन आणि ‘शिकणे’ या संकल्पनेच्या नव्या उभारीतही दिसून येतो.
इंद्रायणी व पवनामाई नद्यांच्या सुपिकतेने नटलेला मावळ तालुका इतिहास काळापासून दुर्गम डोंगराळ भागाचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपत आलेला आहे. जगतगुरू श्री संत तुकोबाराय व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अशा अनेक संतांच्या संत साहित्याने या प्रांताला ज्ञानाचा प्रकाश दाखविला आहे. ही माती शूरवीरांच्या पराक्रमाने नटलेली, शेतकऱ्यांच्या घामाचे भिजलेली आणि असंख्य मावळ्यांच्या स्वाभिमानाने सजलेली आहे.

शिक्षणाच्या पाऊलवाटा दूरवर
पूर्वीच्या काळापासून पूर्वजांकडून मिळालेला शिक्षणाचा वारसाही मावळच्या मातीने टिकवून ठेवलेला आहे. पूर्वी काही प्रमुख ठिकाणेच शिक्षणाची केंद्रे होती. तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा, खंडाळा, पवनानगर, चांदखेड, टाकवे अशा प्रमुख ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी केंद्रिभूत झालेल्या शिक्षणाच्या पाऊलवाटा आता मोठे मार्ग बनून मावळातील सर्वदूर अशा टोकाच्या दुर्गम भागात व कड्या-कपारीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. काळाची पावले ओळखून अध्ययन, अध्यापन प्रक्रिया आता पारंपरिक न राहता ती अत्याधुनिक होत चाललेली आहे. तंत्रज्ञानाने साधलेली प्रगतीने शिक्षण क्षेत्राही मागे राहिलेले नाही.

ई-लर्निंगयुक्त शाळा
तालुक्यातील अनेक शाळा केवळ संगणकयुक्त झाल्या नसून ई-लनिंगयुक्त झाल्या आहेत. शिक्षणातील नवनवीन प्रवाहानुसार पाठ्यक्रमाने संगणकात सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रवेश घेतलेला असल्याने अध्ययन, अध्यापन प्रवाही व वेगवान होत चालले आहे. पाठ्यपुस्तकातील कविता, पाढे, गाणी, विज्ञानातील प्रयोग अशा शैक्षणिक अनुभूती आता ई-लनिंगच्या माध्यमातून अनेक शाळांमधून चालू आहेत. अनेक संगणक साक्षर शिक्षक यासंदर्भात वेबसाईट व अॅपस् बनवत आहेत. नवीन अभ्यासक्रम, प्रशिक्षणही आता ऑनलाईन झाले आहे. भविष्यात लवकरच ‘डिजिटल क्लासरूम’ ही संकल्पना मावळमधील अनेक शाळांमधून साकारण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रयत्न चालू आहेत.

दुर्गम गावांपर्यंत शिक्षण
पूर्वी तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा, पवनानगर, टाकवे बुद्रूक, चांदखेड ही मोजकीच ठिकाणे शिक्षणाची केंद्रे होती. पण, काळाने वेग घेतला. रस्ते रुंद झाले आणि शिक्षण दूरदूरच्या दुर्गम गावांपर्यंत पोहोचले. आज मावळातील प्रत्येक कड्या-कपारीत शिक्षण पोहोचले आहे. प्राथमिक-माध्यमिक शाळा,
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, एमआयडीसीमुळे वाढलेले औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, वैद्यकीय-निमवैद्यकीय संस्था, व्यवसाय विकास व व्यवस्थापन अभ्यासक्रम यामुळे मावळ ‘शैक्षणिक हब’ म्हणून उदयास आले आहे. पुणे-मुंबई महामार्गाच्या मध्यावर असलेल्या या तालुक्याची ही मोठी ताकद ठरते.

कला, क्रीडेचा वारसा
मावळ तालुक्याला पूर्वीपासूनच कलेचा वारसा लाभलेला आहे. इथली लाल मातीही अनेक मराठी मातीतील खेळांनी सजलेली आहे. कबड्डी, खो-खो, कुस्ती, ढोल-लेझीम, लोकनृत्य, समूहगीत अशा अनेक प्रकारांनी शाळांमध्ये सांस्कृतिक बांधिलकी निर्माण केलेली आहे. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेतून शाळेतील विद्यार्थ्यांच्या नवचैतन्याला सुप्त गुणांना अनोखा बहरच आलेला असतो. तालुका, जिल्हा, राज्य अशा अनेक पातळ्यांवर हे विद्यार्थी चमकतात. यासाठी सर्व शिक्षकवर्ग दिवसरात्र मेहनत घेत असतो. पिंपरी चिंचवड व पुणे या शहरांतूनही या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होत असते. अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण व पुढील स्तरावरील योग्य मार्गदर्शनाची व सुयोग्य संधीची गरज आहे.

स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी
इस्रो व नासा संशोधन संस्था भेटीसाठी तालुक्यातील मुलांची निवड झाली आहे. शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षा त्याचबरोबर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा राष्ट्रीय गुणवत्ता शोध परीक्षा अशा गुणवत्तेवर आधारीत व भविष्यात स्पर्धा परीक्षांना पूरक अशा परीक्षा अनेक शाळांमधून घेतल्या जात असून त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. त्यामधूनच अनेक विद्यार्थी तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत यश मिळवत आहेत. यासाठी शिक्षण विभागाकडून तालुका व विभाग स्तरावर विशेष मार्गदर्शन व कार्यशाळांचे नियोजन केलेले आहे. त्याद्वारे, विद्यार्थी व शिक्षकांना योग्य लक्ष्य गाठता येईल आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या आव्हानांना सामोरे जाता येईल. विद्यार्थी व शिक्षकांसाठी तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर बालसाहित्य व शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. तसेच पुस्तक प्रदर्शन, वाचन प्रकल्प, वाचन प्रेरणा दिन अशा विविध उपक्रमांतून शिक्षक व विद्यार्थी आपले कौशल्य दाखवत आहेत. कविता लेखन, कथालेखन, वक्तृत्व, साहित्य लेखन दिली जात आहे.

मावळचा ‘स्मार्ट’ चेहरा
अत्याधुनिक शैक्षणिक सुविधामुळे बदलत्या मावळाचा स्मार्ट चेहरा बघायला मिळत आहे. आज तालुक्यातील अनेक शाळा व अंगणवाड्या उत्कृष्ट भौतिक सुविधांनी सजल्या आहेत. सुसज्ज वर्गखोल्या, डिजीटल शिक्षणसामग्री, स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टर, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, सुरक्षा भिंती, क्रीडांगणे, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था, अपंगांसाठी रॅम्प सुविधा, बोलक्या भिंती व आकर्षक शैक्षणिक आवार, हे शक्य झाले आहे. त्यासाठी तालुक्यातील उत्तम शैक्षणिक नियोजन व व्यवस्थापन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायती, गावकरी, स्वयंसेवी संस्था, सीएसआर अंतर्गत मदत देणाऱ्या उद्योगसंस्था, दानशूर व्यक्ती, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे. बदलत्या काळात ‘आनंदी शाळा’, ‘स्वच्छ शाळा’, ‘गुणवत्ता अभियान’, ‘शिक्षणाचा हक्क’ यांसारख्या उपक्रमांनी शाळा आधुनिकतेकडे वाटचाल करू लागल्या आहेत.

ई-लर्निंग ही नवी ओळख
संगणक शिक्षण आणि ई-लर्निंग ही डिजीटल मावळाची नवी ओळख बनत आहे. शिक्षण आता फक्त फळ्यावर नाही; ते मोबाईल-टॅब-संगणकावर पोहोचले आहे. मावळही यात मागे नाही. संगणक प्रयोगशाळा, ई-लर्निंग क्लासरूम, इंटरनेट सुविधा, डिजीटल ग्रंथालय, सॉफ्टवेअर आधारित अध्यापन, कोरोना काळात तर मावळातील तंत्रस्नेही शिक्षकांनी गुगल मीट, झूम, यूट्यूब, पीडीएफ, गुगल क्लासरूम यांचा वापर करून शिक्षणाची संकल्पनाच बदलून टाकली. स्वनिर्मित व्हिडीओ, २ डी-चित्रफिती, शैक्षणिक नाट्य सादरीकरणे, क्यूआर कोडद्वारे अभ्यासक्रम या सर्वांमुळे अध्ययन, अध्यापन अधिक आनंदी, प्रवाही आणि प्रभावी झाले आहे. निकट भविष्यात ‘डिजिटल क्लासरूम मावळ’, स्मार्ट स्कूल उपक्रम, ‘एआय आधारित शिक्षण साहित्य’, या दिशेने मोठी पावले उचलली जात आहेत.

कला-क्रीडामधून उर्जा
कला, क्रीडा आणि संगीत हे मावळची जडणघडण घडवणारी उर्जा आहे. मावळच्या लाल मातीतून कला व क्रीडेला स्फूर्ती मिळते. शाळांमध्ये कबड्डी, खो-खो, कुस्ती, लेझीम, लोकनृत्य, समूहगीत, भजन-कीर्तन अशा अनेक क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांची सुप्त प्रतीभा फुलते. तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर मावळचे विद्यार्थी चमकताना दिसतात. त्यामागे शिक्षकांचे परिश्रम, पालकांचा विश्वास आणि संस्थांचा पाठिंबा या तीनही आधारस्तंभांचा हात आहे.

उपक्रमशील, स्मार्ट शिक्षक
शिक्षक हा केवळ अध्यापक नसतो; तो भविष्याची शिल्पे घडवणारा कलाकार असतो. मावळातील शिक्षकांनी काळ ओळखून अद्ययावत प्रशिक्षण घेतले. नवनवीन पद्धती आत्मसात केल्या, क्यूआर कोड, स्मार्ट ऍप्स, स्वतःचे व्हिडीओ तयार केले. नवोपक्रम राबवले. प्रकल्पाधारित शिक्षण लागू केले. जीवनकौशल्यांवर भर दिला. मुलांच्या मानसिक, भावनिक गरजा समजून घेतल्या. त्यामुळे आज मावळातील प्रत्येक शाळा ही प्रयोगशाळा बनली आहे. इथे शिकवणारा शिक्षक हा फक्त ‘मार्गदर्शक’ नाही; तर सहयात्री आहे.

मुलींच्या शिक्षणात अग्रेसर
मावळ तालुका मुलींच्या शिक्षणातही पुढे चालला आहे. शाळेत मुलींची उपस्थिती, त्यांचे शैक्षणिक यश, क्रीडा क्षेत्रातील सहभाग, विज्ञान स्पर्धांत मिळवलेली बक्षिसे हे सर्व तालुक्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. मोफत सायकल योजना, बालिका सुरक्षा उपाय, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, मुलींसाठी नेतृत्व प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शनया सगळ्यांमुळे मावळातील मुली उद्याच्या समाजात सशक्त, स्वावलंबी आणि प्रगत बनत आहेत.

शिक्षणाने नोकरीच्या संधी
शिक्षणामुळे नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्टा, पुणे व हिंजवडी आयटी पार्क, तळेगाव, चाकणमधील एमआयडीसी, पुणे - मुंबई महामार्गावरील व्यावसायिक संधी यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार आयटी, उत्पादन, डिझाईन, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स, आरोग्यसेवा अशा क्षेत्रांत विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची उत्तम शक्यता आहे.

स्मार्ट शैक्षणिक मावळ
इंद्रायणी, पवनामाईचे पाणी जसे अखंडपणे मावळला समृद्ध करत राहते. तसेच आधुनिक शिक्षणाची गंगा आज प्रत्येक वाड्या-वस्त्यांपर्यंत वाहत आहे. तुकोबारायांच्या अभंगांनी आणि ज्ञानोबारायांच्या ओव्यांनी जसा समाज उजळला. त्याचप्रमाणे आज स्मार्ट तंत्रज्ञानाचे शिक्षण विचारांची सुपीकता वाढवत आहे. इंद्रायणीचा नाद, आंबेमोहोर तांदळाचा सुगंध आणि शिक्षणाचा प्रकाश हे तिन्ही मिळून एक नवीन, आधुनिक, विकसित ‘स्मार्ट शैक्षणिक मावळ’ उभा करत आहेत. सामूहिक प्रयत्नांमुळे मावळचे शैक्षणिक स्वप्न साकारते आहे. या संपूर्ण परिवर्तनात शिक्षण विभाग तालुका प्रशासन, हजारो शिक्षक, शेकडो संस्था, दानशूर व्यक्ती, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ, समाजसेवी संस्था, स्थानिक प्रशासन या सर्वांचा सामूहिक प्रयत्न आहे.
मावळ मातीचा गंधच आगळा आणि भविष्यातील प्रकाशही आगळाच ! लोहगड-विसापूरची छाया, इंद्रायणीचा गारवा, तुकोबारायांची शिकवण, ज्ञानेश्वरांची करुणा आणि आधुनिक शिक्षणाचा उजळ नवा मार्ग यांचे अद्‍भुत मिश्रण म्हणजे स्मार्ट शैक्षणिक मावळ. मावळ उभा आहे, तो तंत्रज्ञानात सक्षम, संस्कृतीत समृद्ध, शिक्षणात प्रगत आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार व सक्षम आहे. माझ्या मावळ मातीचा, गंधच आगळा ही भावना आता मावळ शिक्षणाचा, प्रकाशच आगळा, अशी उजळत आहे.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT