वडगाव निंबाळकर, ता. ४ ः बारामती तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सुरू असला, तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण वातावरण बदलून गेले आहे. जिथे निवडणुकीच्या काळात गाजावाजा, सभा, घोषणा आणि स्पीकरचे आवाज घुमत असतात, तिथे फक्त गाठीभेटी घेऊन प्रचार सुरू आहे.
दादांच्या निधनानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या राजकीय भूमिका बाजूला ठेवून ठिकठिकाणी शोकसभा आयोजित केल्या. फलक, बॅनर आणि घोषणा याऐवजी हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण तालुका शोकमय वातावरणात बुडाला. गावागावांत चौकात चर्चा सुरू आहे, पण तीही शांत स्वरात दादांच्या आठवणींनी भरलेली.
या भावनिक वातावरणाचा परिणाम केवळ राजकारणावरच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला आहे. अनेक कुटुंबांनी आपले घरगुती कार्यक्रम, समारंभ साध्या पद्धतीने पार पाडले. कुणी गोडधोड टाळले, कुणी कार्यक्रम पुढे ढकलले, तर कुणी मौन बाळगत दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरुवातीला पूर्णपणे थंडावला होता. मात्र कालांतराने उमेदवारांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह गाठीभेटी सुरू केल्या आहेत. कोणताही डामडौल नाही, स्पीकर नाहीत, मोठ्या सभा नाहीत. प्रचार आहे, पण तो पत्रके वाटून, हात जोडून, शांत संवादातून सुरू आहे.
पूर्वीप्रमाणे तालुक्यात प्रचाराचे स्पीकर वाजत नाहीत. घोषणांच्या आरोळ्या, टाळ्यांचा कडकडाट आणि गर्दीचे चित्र दिसत नाही. प्रत्येकजण जणू शब्द जपून वापरत आहे. कारण अजूनही दादांच्या जाण्याची जखम ताजी आहे.
या संपूर्ण भावनिक वातावरणात नागरिक नेमके कोणाला मतदान करतील, कोणत्या नेतृत्वावर विश्वास ठेवतील, हे येणाऱ्या निवडणुकीत उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र एवढे निश्चित आहे की, या निवडणुकीवर दादांच्या आठवणींची आणि त्यांच्या कार्याची खोल छाप राहणार आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडे चार उमेदवारांनी प्रचारासाठी स्पीकर परवाना ना हरकत मागणी केली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधना आधी दोन परवान्यांचा समावेश आहे. ना हरकत घेतलेले दोन अपक्ष उमेदवार आहेत. कोणत्याही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने परवानगीसाठी मागणी केली नाही, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे विलास ओमासे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.