वेल्हे, ता.१९ : साहेब, अठरागाव मावळ परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. ग्रामसेवक व तलाठी भेटत नाहीत. भात पिकांवर करपा रोग गेलाय. त्याचे पंचनामे झाले नाहीत. लाइट गेली तर चार ते पाच दिवस येत नाय. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन सुद्धा या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने गावातील तरुणांची स्थलांतर होत आहे, अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा ग्रामस्थांनी आमदार शंकर मांडेकर यांच्यापुढे वाचला.
पासली (ता.राजगड) येथे नुकताच मांडेकर यांनी पीक पाहणी दौरा आयोजित केला होता. ऐतिहासिक अठरागाव मावळ परिसरातील करनवडी येथील ग्रामपंचायत सदस्य अंकिता पवार, राजू पवार, केळद चे माजी सरपंच रमेश शिंदे, हारपुड गावचे अंकुश कुमकर, तानाजी धुमाळ , कुंबळेचे माजी सरपंच विजय बलकवडे, बालवाडचे सरपंच सुनील पारठे, शेणवडचे उपसरपंच अशोक भुरुक, यांनी परिसरातील अनेक नागरिकांनी समस्या मांडल्या व एक मुखाने परिसराचा विकास होण्यासाठी रायगड जिल्ह्याला जोडणारा मार्गाचे काम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मला जागडे, अमोल नलावडे, संदीप खुटवड, गोपाळ इंगुळकर, गुलाब रसाळ, शंकर रेणुसे, संतोष रेणुसे, बाबू गोरड, रवींद्र रांजणे, आनंद देशमाने आदींसह कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्येवर बोलताना आमदार शंकर मांडेकर म्हणाले, अठरागाव मावळ परिसरातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल तर प्रशासकीय पातळीवर लोकप्रतिनिधी व अधिकारी कर्मचाऱ्यांची तत्काळ बैठक घेऊन समस्यांचे निराकरण केले जाईल.