वेल्हे, ता. १६ : राजगड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील आसनी दामगुडा परिसरात गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस बिबट्याने वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये दोन लहान जनावरे तसेच एक वासरू ठार झाले असून संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हल्ल्यांमध्ये भीमराव मारुती दामगुडे, किसन वाघु कचरे व संजय इंगवले या शेतकऱ्यांच्या पशुधनाचा बळी गेला आहे. सलग तीन दिवस झालेल्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी वर्ग प्रचंड दहशतीत असून, पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही शेतकऱ्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याचीही चर्चा असून, संध्याकाळी व पहाटेच्या सुमारास गावाबाहेर जाणे धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सलग होणाऱ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण आसनी दामगुडा, मंजाई आसनी, कोदवडी, सुरवड, भागीनघर व शेजारील परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी वनपाल व वनरक्षकांना त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिसरात गस्त वाढविणे, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजगड तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाताना तसेच संध्याकाळच्या सुमारास स्वतःची व पशुधनाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.जनावरे मोकळ्या जागेत अथवा गोठ्याच्या बाहेर बांधू नये. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.
- अनिल लांडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी
3398
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.