पुणे

राजगड ट्रेक ठरतोय जीवघेणा!

CD

वेल्हे, ता. १६ : किल्ले राजगडावर (ता.राजगड) गेल्या २० दिवसांत दोन पर्यटकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गड-किल्ल्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढती गर्दी पाहता प्रशासनाने किल्ल्यांवर तातडीने आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा आणि रेस्क्यू टीम तैनात करावी, अशी मागणी नागरिक व गिर्यारोहकांकडून होत आहे.
स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनाकडून अथवा पुरातत्त्व विभागाकडून गडावर प्राथमिक उपचारांची कोणतीही सोय नाही. सुट्टीच्या दिवशी गडावर आरोग्य कर्मचारी, पोलिस, रुग्णवाहिका आणि अत्याधुनिक बचाव साहित्य असणे अनिवार्य झाले आहे.तर प्रशासनाबरोबर नागरिकांनी सुद्धा ट्रेकिंग करताना महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे अथवा शारीरिक क्षमता पाहून ट्रेकिंग करणे जेणेकरून पर्यटन हे जीवघेणे ठरणार नाही, असे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.

पर्यटकांनी ही काळजी घ्यावी:
ट्रेकपूर्वी किल्ल्याची माहिती घ्या व अनुभवी संस्था अथवा स्थानिक नागरिक, गाइड सोबतच ट्रेक करा
सोबत प्रथमोपचार पेटी आणि एनर्जी ड्रिंक्स ठेवा
शारीरिक क्षमता ओळखूनच चढाई करा; उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा शारीरिक त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रेक करा.
ट्रेकच्या वेळी परिसरातील आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, पोलीस प्रशासन, पत्रकार संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत.

प्रशासकीय उपाययोजनांची गरज:
गडाच्या पायथ्याशी पर्यटकांची नोंदणी व प्राथमिक आरोग्य तपासणी व्हावी
गडाच्या खाली व गडावरती पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक
किल्ल्यांवरती धोकादायक ठिकाणी सूचना आणि इशारे फलक लावावे आणि गर्दीच्या वेळी रुग्णवाहिका सज्ज ठेवावी
आपत्ती व्यवस्थापन टीमला अत्याधुनिक साहित्य पुरवावे
गर्दीच्या हंगामात प्रशिक्षित बचाव पथके आणि प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

चुकीची जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे तसेच धूम्रपान,तंबाखू,मद्यपान व अति वाढलेले वजन यामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहे. ट्रेकिंगसारख्या शारीरिक कष्टाच्या कामापूर्वी हृदयाची तपासणी करणे गरजेचे आहे. लक्षणे नसली तरी हृदयरोग दडलेला असू शकतो.
- डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ज्ञ तथा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य सेना, पुणे


शेकडो वर्षापासून सह्याद्रीमधील गडकोट तेथेच आहेत व राहणार आहेत. गिर्यारोहण असा खेळ आहे की ज्यामध्ये कोणाशीही स्पर्धा करायची नसते. प्रत्येकाने स्वतःची शारीरिक क्षमता समजून घेऊन आणि प्रशिक्षित, अनुभवी ट्रेकर संस्थेच्या माध्यमातूनच तसेच प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असणारे साहित्य घेऊनच ट्रेक करावा.
- लहू उघडे, एव्हरेस्ट वीर

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Peshwa Descendants : पेशव्यांचे वंशज सध्या कुठे आहेत? कशी आहे त्यांची आत्ताची परिस्थिती..पाहा इतिहासातून वर्तमानाचा उलगडा

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

SCROLL FOR NEXT