वालचंदनगर, ता. २७ : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ढोल-ताशा गजरामध्ये गणरायाची मिरवणुक काढून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंक्शन, लासुर्णे, वालचंदनगर, कळंब, भवानीनगरमध्ये गणरायाची ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मिरवणुक काढण्यात आली.
सार्वजनिक उत्सव मंडळांनी दुपारपासून मिरवणुकीला सुरुवात केली होती. लासुर्णेमध्ये सरपंच सागर पाटील यांच्या हस्ते पूजा केली. लासुर्णे गावामध्ये एक गाव एक गणपती बसविण्यात येतो. श्री निलकंठेश्वर गणेश उत्सव मंडळाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. गावातील मुस्लिम बांधव ही गणेश उत्सवामध्ये सहभागी झाले होते. भवानीनगर मध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गणपती उत्सव साजरा करण्यात येतो.