वालचंदनगर, ता.१ : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाची पहिली उचल ३१०१ रुपये प्रतिटन जाहीर केली आहे. कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी उचल ठरली आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून कसली ही कपात न करता १० डिसेंबर रोजी गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
कारखान्याच्या पहिल्या हप्त्याकडे इंदापूर, बारामतीसह जिल्हातील सहकारी साखर कारखान्यांचे लक्ष लागले होते. कारखान्याच्या संचालक मंडळाने सोमवारी (ता.१) चालू गाळप हंगामातील उसाचा पहिला हप्ता जाहीर केला. यावेळी अध्यक्ष जाचक व उपाध्यक्ष गावडे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संचालक मंडळ पारदर्शक कारभार पाहत आहे. कारखाना सभासद व गेटकेनधारकाच्या उसाला समान भाव देण्यात येणार आहे. उशीरा तुटणाऱ्या खोडवा उसाला पहिला हप्ता ३२०१ रुपये व सुरू व पूर्व हंगामी उसाला ३१७६ रुपये मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या साखरेच्या उताऱ्यामध्ये सरासरी एक टक्याने वाढल्यामुळे २०२६ च्या दिवाळीला देखील शेतकऱ्यांना चांगले पैसे देता येतील. कारखान्यामध्ये ओव्हर हॉलिंगची व दुरुस्ती कामे चांगली केल्यामुळे सातत्याने आठ हजार टनापेक्षा अधिक गाळप होत आहे. कारखान्याच्या विस्तार वाढीनंतर आठ हजाराच्या पुढे गाळप होणारे हे पहिलेच वर्ष आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे १.५ लाखापेक्षा अधिक गाळप झाले आहे.
यावेळी संचालक शिवाजी निंबाळकर, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, अशोक जाधव, हनुमंत करवर उपस्थित होते.
कारखान्याचा वजन काटा शंभर टक्के अचुक
संचालक मंडळाने यापूर्वी ‘माझा कारखाना, माझी जबाबदारी, वजन चोख, पैसे रोख. ऊस छत्रपतीला देऊ बिनधोख’ अशी टॅग लाइन केली होती. आत्ता संचालक मंडळाने वेळेत धन हजार किलोचा टन ही नवीन टॅग लाइन करून कारखान्याचा वजन काटा शंभर टक्के अचुक असल्याचे छातीठोक पणे सांगत आहेत.
२ लाख १२ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन
छत्रपती साखर कारखान्याने रविवारपर्यंत (ता.३०) कारखान्याने ३० दिवसांत दोन लाख १६ हजार ५०३ टन उसाचे गाळप केले आहे. दोन लाख १२ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखरेचा उतारा १०.२२ टक्के व रविवारचा उतारा ११.०९ टक्के आहे. कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पातून ६४ लाख ८८ हजार युनिट वीज महावितरणाला निर्यात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.