वाल्हे, ता. ६ : पुरंदर तालुक्यातील उसाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांडकी येथील उच्चशिक्षित तरुणाने उसाच्या शेतीत कमाल केली आहे. एक दोन नव्हे तब्बल पाच वर्षे एका एकरात शंभर टनाच्या जास्तीचे उत्पादन घेत यंदा १०७ टन उसाचे उत्पादन घेऊन त्याने शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. सचिन श्यामराव गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तरी काहीही साध्य करता येते, हेच या तरुणाने दाखवून दिले आहे.
ज्या वयात वडिलांचा हात धरुन स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजही मुले धडपडत या वयातच सचिनचे आई-वडिलांचे छत्र हरपले.
वडिलोपार्जित वाट्याला आलेल्या शेतजमिनीत शेती करण्याचा ध्यास बाळगून सचिन जिद्दीने नव काहीतरी करण्यासाठी अग्रेसर राहिला आहे. तब्बल पाच वर्षे उसाचे पीक घेऊन त्यातून एकरी शंभरीच्या आतबाहेर टन उसाचे उत्पादनाचे यश सचिनच्या कष्टाला बळ देणारे ठरले आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या मशागतीसाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचे नेटके नियंत्रण त्याने ऊस पिकासाठी निश्चित केले. सेंद्रिय खतावर भर दिला. जमिनीचा हा सामू वाढवण्यासाठी पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील सचिन गायकवाड यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाने जमिनीचा सेंद्रिय कर्ब तर वाढवला. मात्र, त्याचबरोबर उत्पादन खर्चाची बचत करत सलग पाचव्या वर्षी शंभर टनाच्या वरचा टप्पा पार करत यंदादेखील अवघ्या एका एकरामध्ये १०७ टन ऊस उत्पादनाचा विक्रम देखील केला.
गायकवाड यांना मांडकी येथे बारा एकर शेती आहे. गायकवाड कुटुंबीयांनी शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांची योग्य मात्रा देऊन शेतीमध्ये हा खर्च कमी करता येऊ शकतो, हे दाखवून दिले. गतवर्षी गायकवाड यांनी ८६०३२ या उसाच्या जातीची लागण केली होती. सुरुवातीपासूनच रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करत सेंद्रिय पद्धतीने हा ऊस वाढविण्याकडे त्याचा कल होता. एकीकडे संपूर्णपणे रासायनिक खताची मात्रा वापरून देखील अनेक शेतकरी एकरी शंभर टनापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मात्र, सेंद्रिय आणि रासायनिक खतांची योग्य जोड दिली तर शेती फायदेशीर ठरू शकते, हे गायकवाड यांनी दाखवून दिले. कमी खर्चात एकरी १०७ टन ऊस उत्पादन काढण्याची किमया गायकवाड कुटुंबीयांनी साधली आहे.सचिन गायकवाड पत्नी रोहिणी गायकवाड व मुलगी श्रुष्टी गायकवाड यांच्यासोबत शेती करीत आहेत.
सुटसुटीत अंतरामुळे रोपांची चांगली वाढ
पूर्वी उसाचे एकरी शंभर टनांपर्यंतच उत्पादन यायचे. साडेतीन फुटी सरीत लागवड केली जायची. पुढे व्यवस्थापनात सुधारणा करताना लागवडीची पद्धत बदलली. जसा जमिनीचा प्रकार असेल व चढउतार असेल त्यानुसार सरीची पध्दत वा ती किती सोडायची हे निश्चित केले जाते. यात साडेचार फुटापासून ते पाच फुटी पट्ट्यापर्यंत प्रयोग करून पाहिले आहेत. शक्यतो दोन रोपांतील अंतर दोन फूट ठेवले जाते. सुटसुटीत अंतरामुळे रोपांची चांगली वाढ होते. त्याचा परिणाम ऊस उत्पादनवाढीवर होतो. मुरमाड जमिनीत अंतर कमी तर काळ्या जमिनीत जास्त ठेवले जाते. पाणी देण्याच्या पद्धतीतही सुलभपणा येतो. उसाच्या कांड्याऐवजी रोपांची लागवड केली. खोडवा ऊस तुटल्यानंतर पाचटची कुट्टी करून त्यावर सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा वापर केला. जमीन तापवून नियोजनबद्ध लागवड केली. लागवडीचे अंतर हे पाच बाय दोन किंवा साडेपाच बाय दीड फूट असे ठेवले. ८६०३२ हे वाण वापरले.
खतांचे योग्य व्यवस्थापन करून तोटीच्या माध्यमातून अमोनियम सल्फेट, कॅल्सिनिअसम बोरोनाईट, अमोनिया सल्फेट यांसह सेंद्रिय व जैविक खतांची योग्य मात्रा ऊस काढणीच्या एक महिन्यापर्यंत दिली. एका एकरमध्ये उसाच्या रोपांची संख्या पाच हजाराच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला. उसाचे वजन दोन ते तीन किलो मिळाले. त्यातून एकरी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन मिळते. बीज प्रक्रिया, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन, हिरवळीच्या खतांचा वापर, खोडवा पिकातील पाचट व्यवस्थापन आदीबाबींवर
लक्ष केंद्रित केल्यास एकरी १०७ टन ऊस उत्पादन काढणे शक्य आहे.
- सचिन गायकवाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.