वाल्हे, ता. १३ : पुरंदर तालुक्यातील दौंडज गावात भरदिवसा धाडसी चोरी झाली. मात्र, पोलिस आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेल्या सिनेस्टाईल पाठलागात चोरांना पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान ड्रोनचा वापर करून उसाच्या शेतात लपून बसलेल्या चोरट्यांना अचूक शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
दौंडज येथील कदम वस्तीवरील प्रज्वल अनंत कदम व तेजस अनंत कदम यांच्या घरातून शनिवारी (ता. १३) दुपारी तिघा चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोर पळून जात असताना शेजारील युवकांनी त्यांच्यावर संशय घेऊन पाठलाग सुरू केला व याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी वेळीच पावले उचलत थोपटेवाडी रेल्वे गेट येथे नाकाबंदी केली. रेल्वे गेट बंद असल्यामुळे चोरट्यांना थांबावे लागले. यावेळी पाठलाग करत आलेल्या युवकांनी आणि पोलिसांनी चोरट्यांना पकडले, मात्र पिस्तुलाचा धाक दाखवत त्यापैकी दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. एकाला मात्र ताब्यात घेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व त्यांचे पथक रेल्वे गेटशेजारी पोहोचले. चोरट्यांनी उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून शेतातील सर्वेक्षण केले.
या शोध मोहिमेत दौंडज, वाल्हे, जेऊर, पिसुर्टी, पिंपरे, नीरा या गावांतील १५० ते २०० तरुणांनी एकत्र येऊन संपूर्ण शेताला वेढा घातला. पोलिसांच्या सूचनेनुसार कोणीही शेतात न जाता केवळ बाहेरून निगराणी ठेवण्यात आली. शेवटी ड्रोनच्या सहाय्याने चोर शेतात असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी लखनसिंग रतपुतसिंग दुधानी (वय ३५), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (वय ३०), रत्नेश राजकुमार पुरी (वय २३, सर्व रा. संभाजीनगर) या चोरट्यांनी पकडले. या कारवाईत संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, प्रसाद कोळेकर यांचा विशेष सहभाग होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.