वाल्हे, ता. २८ : पुरंदर तालुक्यातील वाल्हे आणि आडाचीवाडी परिसरात बिबट्याच्या वारंवार दर्शनाने पुन्हा मोठी खळबळ उडाली. मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर वाढत असून गुरुवारी (ता. २७) रात्री वाल्ह्यात घराशेजारी बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
वाल्हे (ता. पुरंदर) हद्दीतील दातेवाडी फाट्याजवळ राहणारा ओंकार बबन पवार हा तरुण गुरुवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घरात असताना घरामागच्या बाजूने पाळीव कुत्र्याचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज ऐकू येवू लागला. संशय आल्याने त्याने घराबाहेरील सर्व दिवे लावले आणि परिस्थिती पाहण्यासाठी तो बाहेर आला. त्यावेळी आवाजाच्या दिशेने मोबाइलच्या टॉर्चचा प्रकाश टाकत घरामागच्या शेतात पाहणी करत असताना जेमतेम काही अंतरावर त्याला बिबट्या उभा असल्याचे स्पष्टपणे दिसले. त्याचवेळी त्यांचा पाळीव कुत्रा बिबट्यावर भुंकत प्रतिकार करीत असल्याचेही त्याने पाहिले. हे धक्कादायक दृश्य पाहून क्षणभर घाबरलेल्या ओंकारने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. त्यानंतर त्याने याबाबत कुटुंबियांना माहिती देऊन शेजाऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले.
या घटनेची माहिती देत ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. वनविभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दैनंदिन जीवनावर परिणाम
वाल्हे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कधी दिवसा तर कधी रात्री बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता आणि भितीचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी व महिलांनी शेतात एकटे जाणे थांबवले आहे. शेतातील जनावरे, पिके आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत गावकऱ्यांची चिंता वाढत आहे. दिवसाही घराबाहेर जाणे धोक्याचे वाटत असल्याने परिसरातील दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.