वाल्हे, ता. ४ : पिंगोरी (ता. पुरंदर) येथे गुरुवार (ता. ४) पासून उलूक महोत्सवास सुरुवात झाली आहे. यानिमित्त डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात चिमुकले, शिक्षक, संशोधक आणि परदेशी पक्षीतज्ञ एकत्र आले.
पिंगोरीच्या आकाशात आज घुबडांचे नाही, तर त्यांच्या संरक्षणाचा जयघोष झेपावला. अंधश्रद्धेच्या पंखांना कापत सहाव्या उलूक महोत्सवाने गावाला एक वेगळीच उंच भरारी दिली. इला फाउंडेशनतर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी निसर्गसंवर्धनातील योगदानाची दखल घेत इला हॅबीटेट संशोधन केंद्राने स्वप्नील कुंभोजकर (जयपूर, झालाना), प्रमेसागर मेस्त्री (महाड), भारतभर उल्लेखनीय काम करणारे राजू आचार्य शर्मा (नेपाळ), कोल्हापुर येथील निसर्ग मित्र मंडळाला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक अरविंदकुमार झा, टाटा मोटर्सचे मुख्य व्यवस्थापक नविन पांडे, इला फाउंडेशनचे विश्वस्त संजय खटावकर, सरपंच संदीप यादव, नंदकुमार सागर, पोलिस पाटील राहुल शिंदे, जीवन शिंदे, उपसरपंच भाग्यश्री शिंदे, प्रकाश शिंदे आदि उपस्थित होते. इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी प्रास्ताविक, डॉ. सुरुची पांडे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल लोणकर, राजकुमार पवार यांनी आभार मानले.
भारतीय उलूक महोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर घुबडांविषयीच्या अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक विचारांची पायाभरणी करण्याचा महत्त्वाचा उपक्रम आहे. समाजाने आणि शाळांनी एकत्र येऊन घुबडांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली, तर हे जैवविविधतेसाठी मोठे पाऊल ठरेल.
-विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण.
पिंगोरीसारख्या छोट्या गावाने इतका मोठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे. जनजागृतीमुळे लोकांचा प्रतिसादही अपेक्षेपेक्षा जास्त मिळत आहे. घुबडांचे या भागात योग्य संवर्धन केले तर पिंगोरी भविष्यात घुबडांसाठी एक आदर्श निसर्गक्षेत्र बनू शकते.
- राजू शर्मा, नेपाळ, पक्षीतज्ञ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.