वाल्हे, ता. २७ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यावहारिक अनुभव मिळावा, यासाठी शुक्रवारी (ता. २६) आठवडे बाजाराचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाल्याचे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली. या माध्यमातून त्यांनी व्यावहारिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला आणि विक्री कौशल्याचा अनुभव घेतला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत सुकलवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापिका रूपाली जगदाळे यांनी सांगितले. या वेळी सरपंच संदेश पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच संदेश पवार, उद्योजक राहुल यादव, धनंजय पवार, राजेंद्र चिकणे, दिलीप पवार, देवेंद्र सातपुते, अनिल सुर्वे, वनिता पवार, कुलकर्णी, सुवर्णा चव्हाण, संगीता पवार, अंगणवाडी सेविका उषा पवार, पूनम पवार, प्राजक्ता पवार आदी उपस्थित होते.
ग्रामस्थ व महिलांनी विविध भाजीपाल्याची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या विक्री कौशल्याचे कौतुक केले. याववेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाल्यासोबतच विविध खाद्यपदार्थांचेही स्टॉल लावले होते. ज्यामुळे बाजारात अधिक रंगत आली. सहशिक्षक धनाजी मोरे यांनी आभार मानले.