वाल्हे, ता. ३० : वाल्हे (ता. पुरंदर) येथील वाल्हे–आडाचीवाडी रस्त्यालगत असलेल्या ऊसशेतीला अज्ञात व्यक्तीने आग लावली. ही घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत बाळासाहेब भुजबळ यांचा पाच एकर व सचिन भुजबळ यांचा दीड एकर असा एकूण साडेसहा एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शेजारील दीड एकर ऊस वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आडाचीवाडी रस्त्यालगत असलेल्या बाळासाहेब भुजबळ यांच्या
ऊसशेतीत अचानक धूर व आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. ऊस पुढील महिन्यात तोडणीस येणार असल्याने आगीत संपूर्ण पीक जळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या वेळी अनिल भुजबळ, विमल भुजबळ, तुकाराम भुजबळ, चिमण शहा व संकेत शहा यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र वाऱ्याचा वेग आणि आगीची तीव्रता अधिक असल्याने बाळासाहेब भुजबळ यांचा ऊस वाचविता आला नाही. मात्र, शेजारील शेतकरी चिमण शहा यांचा दीड एकर ऊस वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे वाचविण्यात यश आले.
दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून ऊसशेतीतूनच बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व
शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसशेतीच्या वरच्या बाजूस असलेल्या वरचामळा येथे बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली. त्यामुळे सोमवारी (ता. २९) रात्री पातरमळा येथे एका चिंकारालाही बिबट्याने ठार केल्याचे समोर आले आहे. बिबट्याचे आश्रयस्थान ऊसशेती असल्याने अज्ञात व्यक्तीने बिबट्याच्या भीतीपोटी ऊस पेटविल्याचा संशय भुजबळ कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे रविराज भुजबळ यांनी सांगितले.
या घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असून दोषीवर कडक कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत व
भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
06081