वाल्हे, ता. १ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत पुरंदर तालुक्यातील सुकलवाडी गावात बुधवारी (ता.३१) विकासाचा धडाका पाहायला मिळाला. पुणे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू व गटविकास अधिकारी डॉ. प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी गावास भेट देत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विस्तार अधिकारी बबन चखाले, घरकुल विस्तार अधिकारी अभिजित जेधे, गणेश किकले, उपसरपंच नितीन गावडे, दादासाहेब मदने, वैजयंता दाते, ऊर्मिला पवार, सुप्रिया पवार, शर्मिला पवार, देवराम सातपुते, आनंद चव्हाण, अशोक शिवतारे, माधुरी दाते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या भेटीदरम्यान पाणी संकलन व्यवस्था, सौरऊर्जा प्रकल्प, परसबाग उपक्रम, शौचालयांची उपलब्धता
तसेच अंगणवाडीतील सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले. याप्रसंगी बचतगटातील महिलांसाठी कुकुट पालनाचे तेरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून सुकलवाडी गावात राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत. संविधान दालन, घरकुल, सीसीटिव्ही, कॅमेरे, पाणी संकलन, सौरऊर्जा, स्वच्छता, अंगणवाडी सुविधा आणि परसबाग यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे पाहून समाधान वाटले. ग्रामपंचायत, पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांची एकजूट हीच गावाच्या सर्वांगीण विकासाची खरी ताकद आहे. अशाच नियोजनबद्ध कामांमुळे ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साध्य होईल., असा विश्वास शालिनी कडू यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने वृक्षारोपण करण्यात आले तसेच दिव्यांग बांधवांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड देण्यात आली, अशी माहिती सरपंच संदेश पवार यांनी दिली. यावेळी शालिनी कडू यांनी गावाच्या एन्ट्रीपासून ग्रामपंचायतीने साकारलेल्या बोलक्या भिंतीवरील आकर्षक व सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रांचे विशेष कौतुक केले. गावाची एकजूट, स्वच्छता आणि कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी दर्शविलेली मोठी उपस्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरपंच संदेश पवार यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक सोनल जगदाळे यांनी आभार मानले.
महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.
- डॉ. प्रणोती श्रीश्रीमाळ, गटविकास अधिकारी
6094