वाल्हे, ता. २५ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील प्रतीक दोशी यांचा अल्झायमर आजारावरील महत्त्वपूर्ण संशोधन लेख आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘वृद्धत्व संशोधन आढावा’ (Ageing Research Reviews) या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. वृद्धत्व आणि मेंदूच्या आजारांवरील उपचारांच्या दृष्टीने हे
संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित करून शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जगभरात अल्झायमर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्मरणशक्ती कमी होणे, विचारप्रक्रियेत बिघाड होणे, दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम यामुळे हा आजार केवळ रुग्णालाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबालाही प्रभावित करतो. सध्या उपलब्ध उपचार आजार पूर्णपणे बरा करत नसल्याने नव्या संशोधनाची नितांत गरज आहे. अल्झायमर हा वृद्धांमध्ये आढळणारा मेंदूचा गंभीर आजार असून तो स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि दैनंदिन कार्यक्षमतेवर मोठा परिणाम करतो. सध्या या आजारावर प्रभावी उपचार मर्यादित असल्याने नव्या उपचारदिशांचा शोध घेण्यावर जगभर संशोधन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सेनोलिटिक्स’ या संकल्पनेवर आधारित हा संशोधन लेख प्रकाशित झाला आहे.
या संशोधन लेखामध्ये शरीरात आणि विशेषतः मेंदूत साचणाऱ्या जुन्या व निष्क्रिय पेशी अल्झायमर आजार कसा अधिक गंभीर करतात याचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात आले आहे. या पेशी काळानुसार शरीरातून नष्ट न होता उलट मेंदूमध्ये दाह निर्माण करतात आणि पेशींमधील संवाद बिघडवतात. त्यामुळे
मेंदूचे वृद्धत्व वेगाने वाढत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘सेनोलिटिक्स’ या नव्या औषधी संकल्पनेचा सविस्तर आढावा या लेखात घेण्यात आला आहे. आजार वाढवणाऱ्या या जुन्या पेशींना लक्ष्य करून नष्ट करणारी ही औषधे भविष्यात अल्झायमरच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतात. मेंदूचे वृद्धत्व कमी करून आजाराची गती मंदावता येईल का, हा मूलभूत प्रश्न या संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे.
या संशोधनासाठी प्रतीक दोशी यांना पुणे- पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ फार्मसीच्या प्रा. डॉ. स्वाती सुरेश यांचे मार्गदर्शन लाभले. हा लेख डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ फार्मसी येथील डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म. डी) अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षातील प्रतीक समवेत साक्षी देसले, आरती खुटले, डॉ. सर्वेश सबराथीनम आणि डॉ. स्वाती सुरेश यांनी संयुक्तपणे सादर केला आहे.
संशोधन लेख हा दीर्घ आणि संयमाची परीक्षा घेणारा प्रवास असतो. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी माझ्या मार्गदर्शकांनी दिलेले मार्गदर्शन, सहलेखकांचे सहकार्य आणि मला सतत प्रोत्साहन देणाऱ्या सर्व शुभेच्छुकांचा पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरला. भविष्यात समाजासाठी उपयुक्त ठरेल असे संशोधन
करण्याचा माझा प्रयत्न कायम राहील.
- प्रतीक दोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.