वाल्हे, ता. १८ : महर्षी वाल्मीकी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा मंगळवारी (ता. १७) उत्साहात पार पडला. यादरम्यान तब्बल १९५२ ते २०२४ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विविध पिढ्या एकाच छताखाली एकत्र आल्याचे चित्र संस्मरणीय ठरले.
तब्बल सात दशकांचा शैक्षणिक प्रवास साक्षी ठेवणाऱ्या महर्षी वाल्मीकी विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (ता. १७) विविध पिढ्यांचे माजी
विद्यार्थी एकत्र येत स्नेह, आठवणी आणि कृतज्ञतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यालयाच्या स्थापनेपासून १९५२ ते
२०२४ या कालावधीत इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित महामेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश माधुरी मोरे या होत्या. महामेळाव्यास डॉ. दिगंबर दुर्गाडे, डॉ. एम. एस. जाधव, प्रमोद शहा, प्रा. शिवाजी साळुंखे, प्रा. संतोष ढवळे, सचिन लंबाते, केशव शहा, अतुल गायकवाड, उमेश शहा, दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, अमोल खवले, राहुल यादव, रावसाहेब चव्हाण, सागर भुजबळ, संजीव मोरे, दादासाहेब राऊत यांच्यासह दोनशेहून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या स्थापनेच्या काळात शिक्षण घेतलेल्या तब्बल पंच्याऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांपासून ते पंचवीस वर्षांच्या माजी विद्यार्थ्यांपर्यंत सर्व वयोगटातील एकत्रित उपस्थिती हा मेळाव्याचा आकर्षणबिंदू होती. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. छोट्याशा शाळेपासून आजच्या प्रशस्त इमारतीपर्यंतचा प्रवास आठवत सर्वजण भावुक झाले. शिक्षकांचे मार्गदर्शन, शालेय शिस्त, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलने यांचा उल्लेख होताच उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
दरम्यान यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याच्या अध्यक्षपदी प्रा. अनिल कुंभार व उपाध्यक्षपदी किशोर कुदळे यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राचार्य सतीश निगडे यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रा. अनिल कुंभार यांनी सूत्रसंचालन तर गिरीश पवार यांनी आभार मानले.
विद्यालयाच्या स्थापनेच्या क्षणांचा जिवंत साक्षीदार
महर्षी वाल्मीकी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्यात १९९२ मधील स्थापनेचे साक्षीदार रावसाहेब दगडोबा भुजबळ (वय सुमारे ९०) यांनी हजेरी लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाच्या पायाभरणीचा प्रसंग त्यांनी भावुक स्वरात कथन केला. त्यांच्या मनोगताला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.