वाल्हे, ता. १८ : पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या वेळी कार्यक्रमामध्ये बालचमूंनी एक से बढकर एक नृत्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
पिंपरे खुर्द शाळेने पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे. खाजगी शाळांकडे वळणारा विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळावा तसेच प्राथमिक शाळाही खाजगी शाळांपेक्षा काही कमी नाहीत, हे या शाळेने दाखवून दिले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच राजेंद्र थोपटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहिदास थोपटे, पोलिस पाटील रूपाली सोनवणे आदींच्या हस्ते झाले. या वेळी दिलीप थोपटे, विजय थोपटे, विठ्ठल थोपटे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी संगीत, भजन, लेझीमबरोबरच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली.
प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनी हजारो रुपयांची बक्षीसे दिली. मुख्याध्यापिका विशाखा सोनवणे, महादेव माळवदकर, राजेंद्र गायकवाड, विजया कुंभार, कल्पना निगडे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.