वाकड : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी सकाळी अकरा वाजेपासूनच प्रचंड गडबड आणि राजकीय उत्साह पाहायला मिळाला. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होती. हा चार तासांचा कालावधी अक्षरशः राजकीय रणधुमाळीचा होता. कार्यालयाबाहेर उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते, नेते आणि उत्सुक नागरिकांची गर्दी उसळली होती.
विविध पक्षांच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन टाळून मोजक्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात अर्ज भरण्यास पसंती दिली. त्यामुळे गोंधळ, गोंगाट, कोंडीऐवजी शांततेत आणि सुरळीत अर्ज स्वीकृती प्रकिया झाली. मात्र, काही उमेदवारांनी हलगीच्या कडकडाटात एंट्री मारली. घोषणाबाजी, पक्षांचे झेंडे आणि लाल, पांढऱ्या, भगव्या, हिरव्या उपरण्यांनी संपूर्ण परिसर रंगून गेला होता. अनेक उमेदवार लवाजम्यासह दाखल झाले. काही उमेदवारांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढत कार्यालयात प्रवेश केला. प्रभाग २७ मधील एका इच्छुकाने दुचाकी रॅली काढून स्वतः सायकल चालवत आले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही वातावरण तापलेलेच होते. महत्त्वाचे उमेदवारांपैकी सकाळी साडेअकराच्या सुमारास सत्ताधारी पक्षाचे उमेदवार मोठ्या लवाजम्यासह दाखल झाले. त्यानंतर दुपारी बारा ते एक या वेळेत अपक्ष व विरोधी पक्षांच्या उमेदवारांची ये-जा वाढली. अनेकांनी शेवटच्या क्षणापर्यंत रणनीती गुप्त ठेवत थेट कार्यालयात हजेरी लावली.
शेवटचा अर्धा तास निर्णायक
शेवटच्या अर्ध्या तासात मात्र खरी धावपळ सुरू झाली. महत्त्वाच्या पक्षांचे नेते एबी फॉर्म घेऊन दाखल झाले होते. त्यामुळे अर्जातील त्रुटी, एबी फॉर्मची पूर्तता, सही-साक्षीदार याबाबत काही उमेदवारांची तारांबळ उडाली. कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते इकडून तिकडे धावत होते. अखेर दुपारी तीन वाजता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया थांबताच थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील हा राजकीय गदारोळ ओसरला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर तोबा गर्दी आणि उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या.