यवत, ता. ३० : फूल शेतीवर येणाऱ्या अस्मानी व सुलतानी संकटांमुळे अनेक शेतकरी आता फळ तसेच इतर पिकांकडे वळला आहे. गहू, कांदा, तरकारी, भाजीपाला शेती, केळी व इतर फळ शेती, चारा पिकांची शेती, शेतीपूरक दुग्ध व्यवसाय आदी पर्याय शेतकरी निवडू लागले आहेत. यामुळे दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील नावाजलेल्या फूल शेतीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यास कृषी विभागाकडूनही दुजोरा मिळत आहे.
दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील भुलेश्वर डोंगर रांगेलगतच्या परिसरातील यवतसह डाळिंब, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, भरतगाव, कासुर्डी, भांडगाव, वाखारी या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. यवत हे गाव तर फुलांचे गाव म्हणून चर्चेत असते. या परिसरातील शेतकरी आपल्या तीन-चार पिढ्यांपासून फूल शेती करत आहेत. या फुलांमध्ये गुलछडी, शेवंती वर्गातील राजा, सेंट यलो अशा विविध जातींच्या लागवडी येथील शेतकरी करत होते.
यवत व परिसरात मिळून सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्र फुलपीकांच्या लागवडी खाली आहे. यात चालू वर्षीपासून मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे परवडेना फूलशेती
* पावसाचे व कालव्याच्या पाण्याची अनियमित उपलब्धता
* फुलपीकांवर वाढत चाललेली रोगराई
* औषध व इतर फवारण्यांचा वाढलेला खर्च
* दिवसेंदिवस घटत चाललेले शेतीतील मनुष्यबळ
* प्लॅस्टिक फुलांचा पर्याय, यामुळे घटत चाललेली मागणी
* कमी बाजारभाव
यवत परिसरातील फूल शेतीला ग्रहण लागण्याच्या अनेक कारणांपैकी पुरंदर उपसा सिंचन हेही एक कारण आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भागातील माळशिरस व पोंढे या गावातील मजूर मोठ्या संख्येने यवतच्या फूल शेतकऱ्यांना उपलब्ध होत होता. मात्र, त्यांच्या शेतीला पुरंदर उपसा सिंचनचे पाणी उपलब्ध झाले आणि हा शेतमजूर शेतकरी बनून स्वतःच्या शेतीत काम करू लागला आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वस्त, टिकाऊ व उठावदारपणामुळे प्लॅस्टिक फुलांनी या ओरिजनल फुलांवर मात केली आहे.
केवळ पीक बदलणे हा शेतीसाठी पर्याय नसून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे शेतमालाचा टिकाऊपणा वाढून तो विक्रीसाठी जास्त दिवस आपल्या हाती राहतात. शासनही त्यासाठी सुमारे ३५ टक्के अनुदान देत आहे.
- विनायक जगताप, कृषी सहायक, यवत
सरकार केवळ खाद्यांन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान देत आहे. या योजनेत फूल प्रक्रिया उद्योगाचाही समावेश केल्यास फूल शेतीसाठी चांगला आधार निर्माण होईल. बाजाराभावाची जी समस्या सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तिची तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते.
- सावळाराम हाके, भरतगाव (ता. दौंड)
00987
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.