यवत/चाकण, ता. ४ : अमेरिका, इस्राईल विरुद्ध इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ जिल्ह्यातील कांदा, केळी व खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्यामुळे बाजारभाव कमालीचे घसरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील उत्पादकांची चिंता वाढली आहे. कांदा उत्पादकांसह निर्यातदारही अस्वस्थ झाले आहे.
आखाती देशांना निर्यात करण्यासाठी उत्तम दर्जाचे केळी व खरबूज उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला रमजानच्या महिन्यात चांगला बाजारभाव मिळतो. बोरीबेल (ता. दौंड) येथील शेतकरी बाळकृष्ण पाचपुते अनेक वर्षांपासून निर्यातक्षम केळी व खरबुजाचे उत्पादन घेत आहेत. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात शेतमाल पाठवण्यास युद्धाचा अडथळा निर्माण झाला आहे. केळी तसेच खरबूज ही फळे अधिक काळ टिकणार नाही. परिणामी शेतकऱ्यांवर मोठ्या नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली आहे.
मागील आठवड्यात बोरीबेलमधील केळीला बांधावरच प्रतिकिलो १७ ते १८ रुपयांचा बाजारभाव मिळत होता. त्यास आता सात ते आठ रुपये प्रतिकिलो मिळत आहेत. पुढील आठवड्यात हा भाव अजून कमी होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. खरबुजांच्या बाबतही तेच झाले आहे. बॉबी, कांचन या वाणाच्या खरबुजांना आखाती देशात चांगली मागणी असते. रमजान संपण्याच्या आत युद्ध संपण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे या वर्षी चांगल्या बाजारभावाची आशा या शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे.
केळी आणि खरबुजास रमजानच्या महिन्यात आखाती देशांमध्ये दर वर्षी चांगला बाजारभाव मिळत होता. मात्र, यंदा युद्धाचा फटका बसला आहे. मालाचे उत्पादन वाढत चालले असताना बाजारभाव कोसळत आहे. त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट होणार आहे.
- बाळकृष्ण पाचपुते, शेतकरी बोरीबेल (ता. दौंड)
कांदा उत्पादक, निर्यातदार अस्वस्थ
चाकण : ‘‘जिल्ह्यातून निर्यात होणारा सुमारे दीड हजार टन कांदा मुंबई येथील जवाहरलाल नेहरू (जेएनपीटी) बंदरावर
पडून आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाली आहे. त्याचा फटका बसल्याने कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेले कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे,’’ असे चाकण (ता. खेड) येथील कांदा व्यापारी जमीरभाई काझी यांनी सांगितले.
दुबई येथे कांदा निर्यात कधी सुरू होणार? तेथील बाजारपेठ कधी खुली होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी तसेच निर्यातदार अस्वस्थ झाले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने कांदा कंटेनरमध्ये अडकून पडला आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
बाजारभाव होणार कमी
देशांतर्गत कांदा अधिक प्रमाणात विकावा लागला तर कांद्याचे बाजारभाव कमी होतील व प्रतिकिलो दहा रुपयांपेक्षाही कमी बाजारभाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल, असे कांदा निर्यातदार, व्यापारी प्रशांत गोरे पाटील, व्यापारी माणिक गोरे, राम गोरे यांनी सांगितले.
युद्धजन्य परिस्थितीत कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये तात्काळ अनुदान जाहीर करावे. निर्यात सुरू होईपर्यंत केंद्र सरकारने तात्पुरती खरेदी योजना जाहीर करावी.
- गजानन गांडेकर, शेतकरी बचाव आंदोलन संघटना
01539
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.