महेश जगताप
पुणे, ता. १० : रेडीरेकनरच्या मूल्यांकनुसार महापालिकेने केलेल्या भाडेवाढीचा फटका शहर, उपनगरांतील एकूण ३४ मंडईतील सुमारे पाच हजार व्यापाऱ्यांना बसला आहे. ही भाडेवाढ दहा ते दोनशेपट झाली असल्यामुळे आणि गेल्या दोन वर्षांची थकबाकी भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे मंडईतील गाळ्यावर उपजीविका अवलंबून असणारे हजारो व्यापारी अडचणीत आले आहेत.
आकडे बोलतात
- पुणे शहरात वेगवेगळ्या भागात एकूण ३४ मंडई
- सर्वाधिक १५९० गाळे महात्मा फुले मंडईत
- दुसऱ्या क्रमांकावर मंगळवार पेठ जुना बाजार येथील मंडईत २१७ गाळे
- इतर ३२ मंडईमध्ये दहापासून १०० पर्यंत गाळे
- काही गाळे पक्क्या आणि कच्या स्वरूपाचे
- त्यानुसार त्यांच्याकडून मासिक, सहामाही आणि वार्षिक भाडे घेतले जाते
असे आहे गणित
- यापूर्वी २५० ते ९०० रुपयांपर्यंत मासिक भाडे
- आता नवीन भाडेवाढ पालिकेच्या जागावाटप नियमावलीनुसार आणि रेडीरेकनरनुसार
- त्यामुळे पक्के बांधकाम असलेल्या गाळ्यांचे भाडे सात हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत
- ओट्यावरील गाळेधारकांना १ ते ७ हजार अशी भाडेवाढ
- या गाळेधारकांनी करार करावा तसेच गेल्या दोन वर्षांचे भाडे सुधारित दराने भरावे यासाठी महापालिकेची नोटिसा
- त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर हजारो ते लाखो रुपये भरण्याची वेळ
पायाभूत सुविधांची वानवा
- बऱ्याच मंडईत विजेची सोय नाही
- मंडईत प्रचंड अस्वच्छता
- पाण्याची कमतरता
- गाळ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
- स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, संख्या तोकडी
मंडईतील गाळ्यांचे नवे भाडे हे रेडी रेकनरच्या मूल्यांकनानुसार ठरवलेले आहेत. या पुढे याच दराने त्यांना भाडे भरावे लागेल.
माधव जगताप, अतिक्रमण विभाग प्रमुख, पुणे महापालिका
या मंडईमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. वीज नसल्यामुळे आम्हाला बाहेर बसून भाज्या विकाव्या लागतात मग आम्ही कशासाठी भाववाढ द्यायची?
- विनायक कदम, महात्मा कोतवाल भाजी मंडई, कसबा पेठ
गेली दोन वर्षे कोरोनामुळे आम्ही खाण्यास महाग होतो. कोणतेही उत्पन्न साधन नव्हते. गेल्या दोन वर्षांचे भाडे कमी करण्याऐवजी महापालिका वाढीव दराने भाडे मागत आहे. हा कोणता न्याय आहे?
- नासिर शेख, मंगळवार पेठ, जुना बाजार
भाडेवाढ किती करावी, याचा तरी महापालिकेने विचार केला पाहिजे. आमचे हातावर पोट आहे. महिन्याची जेवढी उलाढाल नाही तेवढे भाडे आमच्याकडून अधिकाऱ्यांना वसूल करायचे आहे.
- ऊर्मिला जाधव, रास्ता पेठ, भाजी मंडई
अजित पवार यांचे आश्वासन !
भाडेवाढ कमी करावी म्हणून महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी पालकमंत्री अजित पवार यांची शनिवारी भेट घेतली. त्यावेळी दोन वर्षांचे भाडे जुन्या दराने घेतले जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. नव्या भाडेवाढीबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी चर्चा करू. महापालिका प्रशासनाने नोटिसा दिल्या म्हणजे भाडेवाढ लागू होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी नगरसेविका रूपाली पाटील ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मंडईतील गाळेधारक अध्यक्ष राजाभाऊ कासुरडे तसेच शारदा शिवरकर, कांचन दोडे, शरद मोरे, किशोर कदम, अजित कुडचे, शैलेश दोडगे, किरण कुर्ले, राबिना शेख यांच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. कोरोनाच्या काळातील भाडे माफ करण्याऐवजी महापालिका प्रशासन भाडेवाढ लादत आहे, असे शिष्टमंडळाने पालकमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रश्न तुमचे, व्यासपीठ ‘सकाळ’चे!
पुणे महापालिकेने शहरातील मंडईंतील गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनी याबाबत आपली मते व प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअप क्रमांकावर कळवाव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.