--- पान ६ नांदेड ----
हळद उत्पादकांना विमा परताव्याची प्रतीक्षा
पावसाच्या खंडामुळे नुकसान; १४ हजार १३ पीकविमा अर्ज
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेल्या ओढीचा फटका जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सलग ३० दिवसांत एकूण ५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यास लागू होणाऱ्या कमी पावसाच्या ट्रिगरनुसार हळद उत्पादकांना विमा भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
शासनाने पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजनेअंतर्गत २०२६ च्या खरीप हंगामात मृग बहरामध्ये हळद पिकाचा समावेश केला होता. नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून १३ हजार ३२७ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. त्यांचे एकूण १४ हजार १३ विमा अर्ज दाखल झाले आहेत. यात सात हजार ५२ हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे. तर या योजनेसाठी शेतकऱ्यांनी सहा कोटी ३१ लाख ९६ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी एक कोटी २६ लाख ३९ हजार रुपये विमा हप्ता दिला आहे. त्यामुळे विमा कंपनीकडे एकूण आठ कोटी ८४ लाख ७५ हजार रुपयांचा विमा हप्ता जमा झाला. या माध्यमातून हळद पिकासाठी तब्बल १२६ कोटी ३९ लाख २५ हजार रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.
एका हेक्टरसाठी एक लाख ८० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चिती करण्यात आली आहे. पुनर्रचित हवामान आधारित विमा योजनेत हळद पिकासाठी विविध हवामान निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सलग ३० दिवस एकूण पाऊस ५० मिलिमीटरपेक्षा कमी झाल्यास कमी पावसाचा ट्रिगर लागू होण्याची तरतूद आहे. या निकषानुसार हेक्टरी ३६ हजार रुपये नुकसान भरपाई देय होऊ शकते. याशिवाय पावसाचा खंड, अवेळी पाऊस आणि अतितापमान यांसाठीही स्वतंत्र निकष निश्चित करण्यात आले आहेत.
----
लोहा, अर्धापूर, हदगावमध्ये सर्वाधिक अर्ज
तालुकानिहाय आकडेवारीनुसार अर्धापूर तालुक्यात २ हजार १६१, हदगावमध्ये २ हजार ८००, लोहा तालुक्यात २ हजार ८९३, नांदेडमध्ये ९८३, मुदखेडमध्ये ८५८, भोकरमध्ये ६०५, उमरीमध्ये ४३६ आणि नायगावमध्ये ३८६ विमा अर्ज दाखल झाले आहेत. लोहा, हदगाव आणि अर्धापूर या तालुक्यांमध्ये हळद विमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग सर्वाधिक आहे.
----
हळद विमाबाबत दृष्टिक्षेप
- विमा सहभागी शेतकरी : १३,३२७
- एकूण विमा अर्ज : १४,०१३
- विमा संरक्षित क्षेत्र : ७,०५२ हेक्टर
- एकूण विमा संरक्षित रक्कम : १२६.३९ कोटी रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.