सवलत नकोच, कारवाईचे पाऊल उचला
मंद्रुळकोळ्यात कर थकबाकीदारांना ५० टक्के सवलतीस ग्रामसभेत विरोध
ढेबेवाडी, ता. २७ : थकबाकीदारांना ग्रामपंचायत करात ५० टक्के सवलत देऊन वसुली करण्याबाबत शासनाने सूचित केले असताना मंद्रुळकोळेतील (ता. पाटण) ग्रामस्थांनी ग्रामसभेत त्यास कडाडून विरोध करत ठराव फेटाळला. सवलतीचा चुकीचा पायंडा पाडू नका, त्याची सवय बनेल, त्याऐवजी सक्तीने करवसुली होण्यासाठी कारवाईची कठोर पावले उचलावीत, असे मत सभेस उपस्थित ग्रामस्थांनी नोंदवले.
ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच भाग्यश्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली. शासनाने ग्रामपंचायत कर थकीत असलेल्यांना ५० टक्के सवलत देऊन वसुलीबाबत सूचित केले आहे. मात्र, त्यासाठी ग्रामसभेत निर्णय, ठराव आवश्यक आहे. मंद्रुळकोळेच्या ग्रामस्थांनी या ठरावाला विरोध करत कोणतीही सवलत देऊ नका, असे स्पष्ट सांगितले. अशा सवलतीमुळे कर चुकविणाऱ्यांना तशीच सवय लागेल, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवर तो अन्याय ठरेल. विकास कामासाठीच्या खर्चावर ग्रामपंचायतीला मर्यादा येतील, असे सांगत ठराव फेटाळला.
सरपंच पाटील म्हणाल्या, ‘‘करवसुलीसंदर्भात ग्रामसभेत झालेल्या निर्णयानुसार संबंधितांनी या महिनाअखेरपूर्वी थकबाकी जमा करून गावच्या विकासात हातभार लावावा.’’ उपसरपंच सपना पाटील, मार्गदर्शक रणजित पाटील, ग्रामविकास अधिकारी सुजाता पाटील, सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
---------
चौकट
----------
मिळकतींचाही
होणार फेरसर्व्हे
मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे आहे. काही वाड्या-वस्त्यांसह ढेबेवाडी बाजारपेठलगतचा परिसर त्यात समाविष्ट आहे. मोठी व्यापार संकुले, अपार्टमेंट येथे उभी राहात असून, करातून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढून त्यातून जनतेला सोयीसुविधा पुरवणे शक्य व्हावे, यासाठी कार्यक्षेत्रातील मिळकतीचा फेरसर्व्हे करण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला. त्यानुसार लवकरच नव्याने मोजमापे घेतली जाणार आहेत.
B07884
मंद्रुळकोळे : ग्रामसभेत चर्चा करताना भाग्यश्री पाटील, रणजित पाटील, सपना पाटील, सुजाता पाटील आदी.
-----------------