दिल्ली पोलिसांचे ‘ऑपरेशन आघात’
सहाशेहून अधिक जणांना अटक
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २७ : राजधानी नवी दिल्लीत नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व्हावे यासाठी दिल्ली पोलिसांनी समाजकंटकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. यासाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन आघात’ अंतर्गत दिल्ली पोलिसांनी काल दक्षिण आणि आग्नेय दिल्लीत धडक कारवाई करताना ६६० हून अधिक जणांना अटक केली. तसेच शस्त्रसाठा, लाखोंची रोकड, बेकायदा मद्य आणि अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. ही मोहीम यानंतरही सुरू राहणार असल्याचे समजते.
नवी दिल्लीत मागील महिन्यात लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोटार स्फोटाच्या दहशतवादी घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नव्या वर्षाचे स्वागत करणे या उत्सवकाळात गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन आघात’ अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साऊथ दिल्ली आणि साऊथ-ईस्ट जिल्हा पोलिसांनी संवेदनशील भागात कालपासून संयुक्त मोहीम सुरू केली. या मोहिमेमध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्या, अमलीपदार्थ तस्कर, दारू विक्रेते, जुगारी आणि सराईत गुन्हेगाराविरुद्ध धडक मोहीम राबविताना २,८०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली, दोन्ही जिल्ह्यांमध्ये ८५० लोकांना ताब्यात घेण्यात आले. तर, एकट्या साऊथ-ईस्ट जिल्ह्यात २८५ जणांना अटक करण्यात आली. या मोहिमेत वाहन चोरीचे जाळे उध्वस्त करण्यावरही भर देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या छाप्यांमध्ये २३१ दुचाकी आणि एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले.