चालकामुळे फिरू लागली रुग्णवाहिकेची चाके
गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालयात सोय उपलब्ध; कंत्राट संपल्याने चार महिने होती गैरसोय
गोंदवले, ता. २९ : ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या चालकाचे कंत्राट संपल्यावर सुस्तावलेल्या प्रशासनाला नव्याने कंत्राट द्यायला तब्बल चार महिने लागले. समाज माध्यमातून याबाबत तक्रारींचा सूर उमटताच प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन चालक उपलब्ध करून दिल्याने अखेर गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेची चाके फिरू लागली आहेत. त्यामुळे आता आपत्कालीन रुग्णांचे हाल कमी होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
रुग्णसेवेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालय जिल्हाभर नावाजले जाते. रुग्णांना आपल्या कुटुंबाप्रमाणे उपचार मिळत असल्याने मोठा मानसिक आधार या रुग्णालयात मिळतोय. औषधे व इतर वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमीच गैरसोयीच्या नजरेतून शासकीय आरोग्य सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन या ग्रामीण रुग्णालयाने बदलून टाकला आहे; परंतु गेल्या चार महिन्यांपासून या व्यवस्थेला सध्या बंद रुग्णवाहिकेचा मोठा अडथळा निर्माण झाला होता.
कंत्राटी चालकाचा कालावधी पूर्ण झाल्याने गेल्या चार महिन्यांपासून चालकाअभावी रुग्णवाहिका रुग्णालय आवारातच उभी होती. परिणामी आपत्कालीन रुग्णांचे मोठे हाल होत होते. रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावरून लातूर- सातारा महामार्ग गेला असून, अनेकदा छोटे मोठे अपघात होत असतात, तसेच सध्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात या परिसरात दाखल झाल्या असून, यांनाही दुखापती होत असल्याने उपचारासाठी तातडीने रुग्णवाहिकेची आवश्यकता भासते. याशिवाय गर्भवती महिला, तसेच गंभीर रुग्णांसाठी तातडीने उपचारासाठी इतरत्र हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता निर्माण होत असतानाच रुग्णवाहिकेला मात्र चालकच नसल्याने वारंवार अडचणींचा सामना करावा लागत होता. आपत्ती काळात स्वखर्चाने खासगी वाहनातून रुग्णांना उपचारासाठी न्यावे लागत होते. रुग्णांच्या या अडचणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकेला चालक मिळावा म्हणून रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांकडे अनेकदा पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता; परंतु वरिष्ठ पातळीवरून मात्र कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे समाज माध्यमांमधून नागरिक संताप व्यक्त करत होते.
अनेक महिन्यांपासून या समस्येकडे काणाडोळा होत असताना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या कानी रुग्णांचा टाहो पडला अन् रुग्णवाहिकेला चालक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. डॉ. करपे यांनी तातडीने चालकाची नेमणूक करण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यामुळे येथील रुग्णवाहिकेसाठी तत्काळ चालकाची नेमणूकही करण्यात आली आहे.
----------------------------------
मानधन घशात
गेल्या चार महिन्यांपूर्वी कंत्राट संपल्याने चालकाला थांबावे लागले खरे; परंतु या काळात ठेका असलेल्या संबंधित कंपनीने चालकाचे मानधन घशात टाकल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे या कंपनीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. डॉ. युवराज करपे व संबंधित अधिकारी याकडे लक्ष देणार का? असा सवाल व्यक्त होत आहे.
......................................................