पुणे, ता. ३ : अजित चौहानच्या उत्तरार्धातील तुफानी चढाया आणि सुनीलकुमार, सोमवीरच्या भक्कम बचावाच्या जोरावर यू मुंबा संघाने प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमातील अखेरच्या टप्प्यात पुणेरी पलटण संघावर ४३-२९ असा सहज विजय साकारला. या विजयासह यू मुंबाने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकांवर झेप घेतली. पुणे संघाकडून घरच्या मैदानावर निराशा झाली.
मध्यंतराला मिळवलेली १९-१६ अशी आघाडी टिकवण्यात पुणेरी पलटण संघाला आलेले अपयश नक्कीच त्यांच्या संघ व्यवस्थापनाला चिंतेत टाकणारे ठरणार यात शंका नाही. उत्तरार्धात पुण्याचा स्थानिक खेळाडू अजित चौहाने चार चढाईतच पुणे संघाला निष्प्रभ केले. अजितच्या या चार चढाईतच यू मुंबा संघाने आत्मविश्वास मिळविला. उत्तरार्धात पहिल्या पाच मिनिटातच लोण स्वीकारावा लागल्यानंतर आलेल्या दडपणातून पुणे संघ बाहेर पडू शकला नाही. सामना संपताना आणखी एक लोण चढवत यू मुंबाने उत्तरार्धातील आक्रमक खेळाच्या जोरावर शानदार विजय मिळविला. अजित चौहाने चढाईत सुपर टेन करताना १२ गुणांची कमाई केली. त्याचवेळी बचावपटू सोमवीर आणि सुनीलकुमारने हाय फाइव्ह पूर्ण केले. पुणे संघाकडून पंकज मोहितने ९ गुणांची कमाई केली. बचावात अबिनेश नंदराजनने ४ गुणांची कमाई केली. कर्णधार आकाश शिंदे आणि मोहित गोयत आपली छाप पाडू शकले नाहीत. या सामन्यातून यू मुंबाचे चढाईपटू मनजित आणि कर्णधार सुनीलकुमार विक्रमाच्या यादीत गेले. मनजीतने लीगच्या इतिहासातील ७०० गुणांचा टप्पा ओलांडला, तर सुनील लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. हा त्याचा ७४वा विजय ठरला. यापूर्वीचा ७३ विजयाचा विक्रम फझल अत्राचलीच्या नावावर होता.
पूर्वार्धात अबिनेशच्या डॅशने जखमी झालेल्या अजित चौहाने पुरेश विश्रांती घेत मध्यंतरानंतर आपला जोर दाखवला. पहिल्याच मिनिटाला अव्वल चढाई करत अजितने यू मुंबाला १९-१९ अशी बरोबरी साधून दिली आणि त्यानंतर पुढच्या चढाईत एक गुण घेत संघाला आघाडीवर नेले. पाठोपाठ तब्बल २० मिनिटांनंतर परवेश बैन्सवालने पहिला गुण मिळवत संघाची आघाडी कायम राखली. मात्र, या चढाओढीत सुनीलकुमार बाहेर गेल्याने यू मुंबालाही गुण गमवावा लागला होता. अजितने तिसऱ्या चढाईत डू और डाय स्थितीत दोन्ही बचावपटूंना बाद करून पाच मिनिटांत पुणे संघावर लोण देत २६-२० अशी मोठी आघाडी घेतली. अजितने सलग चौथ्या लढाईत बोनससह दोन गुणांची कमाई करून पुणेरी संघाचा बचाव खिळखिळा केला. यामुळे उत्तरार्धातील पहिली दहा मिनिटे संपली तेव्हा यू मुंबा संघाने ३१-२३ अशी मोठी आघाडी मिळविली होती.
सोमवीर, सुनीलची दमदार कामगिरी
उत्तरार्धातील अखेरच्या टप्प्यात आघाडीकडे लक्ष ठेवत यू मुंबा संघाने खेळाची गती कमी केली. याचा फायदा घेण्यासाठी पुणेरी संघाची बचावफळी एकवटली होती. मनजित आणि अजित चौहान यांची पकड करून यू मुंबावर दडपण आणले. पण, त्याच वेळी सोमवीर व सुनीलकुमारने दमदार कामगिरी केली. मनजीतने नंतर अबिनेशनला बाद करत एक मिनीट बाकी असताना पुणेरी संघावर दुसरा लोण दिला. या वेळी यू मुंबाने ४३-२८ अशी मोठी आघाडी घेत उर्वरित वेळेत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.