पुणे, ता. १३ : शेवटपर्यंत अटीतटीने झालेल्या सामन्यात तमिळ थलैवाज संघाने पाटणा पायरेट्स संघाला कडवी लढत दिली. मात्र पाटणा संघाने हा सामना ४२-३८ असा जिंकला आणि प्रो-कबड्डी स्पर्धेमधील आपले आव्हान राखले. पूर्वार्धात पाटणा संघाकडे २०-१५ अशी पाच गुणांची आघाडी होती.
म्हाळुंगे-बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धेच्या लढती सुरु आहेत. सामन्यात सुरुवातीपासून आघाडी घेतली की प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर दडपण येते, ही रणनीती उपयोगात आणून पाटणा संघाने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या अकराव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण चढवला. त्यावेळी त्यांनी १६-८ अशी आघाडी घेतली. तमिळ संघाने पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. मध्यंतराला पाटणा संघ पाच गुणांनी आघाडीवर होता.
उत्तरार्धातही पाटणा संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ करीत आपली आघाडी १० गुणांपर्यंत वाढवली. मात्र जिगरबाज तमिळ संघाच्या खेळाडूंनी पाटणा संघाची आघाडी कमी करण्यात यश मिळवले. शेवटची १० मिनिटे बाकी असताना पाटणा संघ २९-२५ असा आघाडीवर होता. सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला तमिळ संघाने लोण चढवत सामन्यातील उत्कंठा वाढविली. अर्थात यावेळी देखील पाटणा संघाकडेच आघाडी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघ ३६-३३ असा आघाडीवर होता.
पाटणा संघाकडून सुपर १० गुण नोंदविणारे देवांक व अयान यांनी उत्कृष्ट चढाया केल्या, तर शुभम शिंदे यांनी महत्त्वाच्या क्षणी पकडी करीत संघास आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तमिळ संघाकडून मोईन शफागी, हिमांशू व सचिन यांनी खोलवर चढाया केल्या.
पुणे संघाकडून बंगळूरचा धुव्वा
प्रो-कबड्डी लीगमध्ये यापूर्वीच आव्हान गमावलेल्या बंगळूर बुल्स संघाला आणखी निस्तेज करताना एकामागून एक चार लोण देत पुणेरी पलटणने शुक्रवारी झालेल्या सामन्यात ५६-१८ असा दणदणीत विजय मिळविला. पंकज मोहिते, आकाश शिंदे, मोहित गोयत यांच्या चढायांना गौरव खत्री आणि अमन यांच्या बचावातील हाय फाईव्हची सुरेख साथ मिळाली. प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी पोहोचण्याचे आपले आव्हान कायम राखले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.