सिंहस्थ- कुंभमेळ्यासाठी ‘हरित कुंभ’ संकल्पना
लोकसहभागातून लाखो वृक्षांची लागवड; धार्मिक व पर्यावरणपूरक वृक्षांना प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : आगामी सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागातर्फे ‘हरित कुंभ’ संकल्पना राबविण्यात येणार असून लोकसहभागातून बेल, रुद्राक्ष, सारंगी, वड, पिंपळ आणि उंबर यांसारख्या धार्मिक व पर्यावरणपूरक वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. रोपांची निर्मिती, लागवड आणि संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागाने शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था तसेच मठ-मंदिरांशी संपर्क साधला असून लवकरच विशेष वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी शेत वनीकरण, सामुदायिक वनीकरण, विस्तार वनीकरण आणि नागरी वनीकरण असे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. शेतकरी शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करतील, तर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामायिक जागांवर सामुदायिक वनीकरण राबविले जाणार आहे. याशिवाय रस्त्यालगत, रेल्वेमार्गांलगत आणि कालव्यांच्या परिसरात वनीकरण करण्यात येईल. शहरांतील मोकळ्या जागा, उद्याने आणि हरित पट्ट्यांमध्ये नागरी वनीकरणाद्वारे वृक्षारोपण केले जाणार आहे.
पहिल्या पावसापूर्वी लागवडीवर भर
बेल, रुद्राक्ष, वड, पिंपळ आणि उंबर यांसारख्या वृक्षांना तुलनेने कमी देखभाल लागते आणि ते वेगाने वाढतात. त्यामुळे पहिल्या पावसापूर्वी लागवड पूर्ण करण्यावर विभागाचा भर आहे. गेल्यावर्षी अडीच ते तीन लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार रिकाम्या जागा, शाळा-महाविद्यालयांचे परिसर तसेच मठ-मंदिरांच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. यंदाही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वृक्ष लागवड पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली.
-------------
कोट
रोपांची लागवड महत्त्वाची असली तरी त्यांचे संगोपन अधिक महत्त्वाचे आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील मठ-मंदिरांचे यासाठी मोठे सहकार्य मिळते. यंदाही लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे.
- गणेश रणदिवे, विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.