पुणे, ता. १ : ‘‘पंढरपूरची वारी ही आपल्याला जगायचे कसे हे शिकवणारी आहे. जी माणसे अजिबात तडजोडी करत नाहीत ती वारीनंतर ‘तडजोडी हेच उत्तम धोरण आहे’, असे म्हणतात. वारी करणारा माणूस कधीही हतबल होत नाही. अनेक प्रकारच्या वाऱ्या केल्या जात असल्या तरी वारी म्हटल्यावर पंढरपूरच, असे समीकरण समाजात रुजले आहे. वारीचा इतका सखोल प्रभाव आहे,’’ असे सांगत ज्येष्ठ कीर्तनकार योगीराज महाराज गोसावी-पैठणकर यांनी ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी।’ या अभंगाचा अर्थ उलगडला.
‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कीर्तन महोत्सवाची सांगता सोमवारी त्यांच्या कीर्तनाने झाली. याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे, वारकरी सेवा प्रतिष्ठानचे प्रेमराज गदादे-पाटील, ‘पुणे सकाळ’चे वृत्तसंपादक धनंजय बिजले आदी उपस्थित होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, परांजपे स्कीम्स आणि वारकरी सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट, पर्वती हे या महोत्सवाचे सहयोगी प्रायोजक होते.
आवडे देवासी तो ऐका प्रकार। नामाचा उच्चार रात्रंदिवस।।
या संत एकनाथ महाराजांच्या अभंगाचे निरूपण योगीराज महाराज गोसावी यांनी केले. ते म्हणाले, ‘‘हा अभंग म्हणजे वारकऱ्यांची आचारसंहिता आहे. देवाला काय आवडते, याबाबत एकनाथ महाराज सांगतात की भगवंताला त्याचे नाव घेणे आवडते. त्यामुळे सतत नामस्मरण करावे. वारकऱ्यांनी कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावलाच पाहिजे. गळ्यात तुळशीमाळ धारण केली पाहिजे. तुळशीमाळ धारण करणे म्हणजे आपला देह परमात्म्याला समर्पित करणे होय. पण एकनाथ महाराज ही दोनच लक्षणे सांगत नाहीत, तर वारकऱ्यांच्या ठायी वैष्णवांचा कळवळा असावा, असेही लक्षण महाराजांनी सांगितले. पांडुरंगाचे दर्शन दररोज किंवा प्रत्येक एकादशीला घ्यायला हवे. मात्र हे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला मात्र पांडुरंगाचे अवश्य दर्शन घ्यावे. कारण आषाढी आणि कार्तिकीला विठुराया देखील भक्तांची वाट पाहत असतो. नामस्मरण करणे, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावणे, गळ्यात तुळशीमाळ धारण करणे, आषाढी-कार्तिकी पंढरपूरची वारी करणे, असा ज्याचा नित्यनेम आहे, तो देवाला आवडतो.’’
‘‘संत भानुदास महाराजांमुळे पंढरपूरची वारी आपण आज करू शकतो, तर संत एकनाथ महाराजांमुळे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आपल्यासमोर आली,’’ असेही योगीराज महाराज गोसावी यांनी सांगितले.
या कीर्तन महोत्सवात कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची याचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र महाराज गाडेकर, प्रवीण महाराज सोळंके, महादेव महाराज वाघमारे यांनी गायनाची आणि गणेश टाके गुरुजी व गजानन महाराज तिडके यांनी मृदंगाची साथ दिली.
----
‘काळानुसार बदलणे गरजेचेच’
‘‘पूर्वीच्या काळी हरिनाम सप्ताहाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कीर्तन करायचे नाही, असा दंडक होता. पण हरिनाम सप्ताहात केवळ वारकरी येत असत. वारकरी नसलेल्या लोकांपर्यंत तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी विविध ठिकाणी कीर्तन करण्यास सुरुवात झाली. जो काळानुसार बदलत नाही, तो संपतो, हा जीवशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाला देखील काळानुसार आपल्यात बदल करावे लागतील,’’ असे योगीराज महाराज गोसावी यांनी नमूद केले.
----
योगीराज महाराज गोसावी म्हणाले
- नामापुढे कोणीही लहान-थोर किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ नाही. कोणीही परमार्थाच्या वाटेवर चालू शकतो.
- राबणे आणि सेवा करणे यात फरक आहे. सेवेला मर्यादा आहेत, पण राबण्याला मर्यादा नाहीत.
- आनंद हा परमात्म्याचा समानार्थी शब्द आहे.
- वारकरी नसताना पंढरपूरला जाणे आणि वारकरी होऊन पंढरपूरला जाणे, यात खूप फरक आहे.
- वारीत आपल्याला स्वतःकडे लहानपण घ्यावे लागते आणि मोठ्याचा हात धरावा लागतो.
- पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या दोन दिवस मुक्काम करतात. त्यातून या स्थानाला पुण्य प्राप्त झाले, म्हणून याला ‘पुणे’ असे नाव प्राप्त झाले असावे.
-----
शिक्षणसंस्थांनी कायम सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही काम करायला हवे, असे वाटते. त्याच भावनेतून आमची ९० वर्षांची परंपरा लाभलेली संस्था या महोत्सवात सहभागी झाली आहे. आज पुण्यातील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. अशावेळी त्यांच्यासाठी कीर्तन महोत्सवासारखे उपक्रम आयोजित करणे, अतिशय महत्त्वाचे आहे. या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.
- डॉ. निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी
---
वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेली ३७ वर्षे वारकऱ्यांची औषधोपचार, चप्पलदुरुस्ती, चष्मेवाटप अशा विविध प्रकारे सेवा करत आहोत. या कीर्तन महोत्सवात सहभागी होऊन आणखी एका प्रकारे ही सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, याचे समाधान आहे.
- प्रेमराज गदादे-पाटील, वारकरी सेवा प्रतिष्ठान, पर्वती, पुणे
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.