पुणे, ता. २७ : गेल्या सात दशकांहून अधिक काळ कलाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे (वय ८१) यांचे मंगळवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. देशपांडे यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. २८) सकाळी ११.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
देशपांडे यांचा जन्म ९ डिसेंबर १९४२ चा. ११ व्या वर्षी त्यांनी बहुरूपी व्यवस्था कला झंकार नृत्य पार्टीच्या मेळ्यांमधून नृत्यांगना म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लीला गांधी यांच्यासह त्यांनी नृत्याचे अनेक कार्यक्रम केले. पुण्यातील डेक्कन, प्रभात, नवयुग यासारख्या स्टुडिओंमध्येही त्यांनी काम केले.
‘बेबंदशाही’ या नाटकातून देशपांडे यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘चिरंजीव आईस’ यासारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नाटकांसह मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. सुमारे शंभरहून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले. यात ‘देवकीनंदन गोपाला’, ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘पुढचं पाऊल’, ‘आईशप्पथ’, ‘माहेरची साडी’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. ‘वक्त के पहले’ आणि ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. तसेच ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘भानगडी शिवाय गाव नाही’, ‘एक तमाशा सुंदर सा’ या वगनाट्यांचेही त्यांनी हजारो प्रयोग केले. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल २०२२ मध्ये राज्य सरकारने नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.