पुणे, ता. २० : ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘शतजन्म शोधिताना’, ‘नाही मी बोलत नाथा’, अशी अजरामर नाट्यगीते... गाजलेली संगीत नाटके आणि त्यामागील कहाणी... अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व अशा दिग्गजांच्या कार्याचा मागोवा, अशी सुंदर गुंफण करत संगीत रंगभूमीची समृद्ध अन् सोनेरी परंपरा सोमवारी उलगडली. नाट्यसंगीताच्या लखलखत्या तेजाने दिवाळीची पूर्वसंध्या उजळली.
निमित्त होते, सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘नाट्यसंगीताची वाटचाल’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे. निपुण धर्माधिकारी लिखित-दिग्दर्शित हा कार्यक्रम प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, गायिका प्रियांका बर्वे आणि अभिनेते अमेय वाघ यांनी सादर केला. पीएनजी एक्सक्लुझिव्ह आणि
न्याती ग्रुप हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. तसेच, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., क्रेझी चीजी कॅफे, देशपांडे रिअल्टी-प्रसाद देशपांडे व्हेन्चर आणि चार्वी हे सहयोगी प्रायोजक होते.
नाट्यसंगीताच्या वैभवशाली परंपरेची ओळख करून देणारा हा कार्यक्रम गोष्टीरुपी संवाद आणि नाट्यगीतांच्या सादरीकरणातून उलगडला. ‘सीता स्वयंवर’ या नाटकापासून झालेली नांदी, पुढे संगीत शाकुंतल नाटकाने झालेली मराठी व्यावसायिक नाटकांची सुरवात, मग ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’ असा संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ, १९६० नंतर ‘संगीत मत्स्यगंधा’, ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकांमधून दूर झालेली संगीत रंगभूमीची मरगळ ते अगदी आजचे ‘संगीत देवबाभळी’, अशा टप्प्याटप्प्याने संगीत रंगभूमीचा प्रवास उलगडत गेला. ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘प्रिये पाहा’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘शतजन्म शोधिताना’, ‘नाही मी बोलत नाथा’, ‘झाले युवती मना’, ‘रवि मी’, ‘नाथ हा माझा’ या राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांनी सादर केलेल्या नाट्यगीतांच्या सादरीकरणाला रसिकांची दाद मिळाली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी पीएनजी एक्सक्लुझिव्हचे भागीदार अभय गाडगीळ व दीपा गाडगीळ, न्याती ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन न्याती, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, देशपांडे रिअल्टीचे अध्यक्ष प्रसाद देशपांडे व भागीदार शिल्पा भराडे, ‘क्रेझी चीजी कॅफे’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार केळकर आदी उपस्थित होते.
फोटोः १६४३३, १६४३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.