‘‘दादा, मुग्धाच्या हृदयाचं ऑपरेशन पुढच्या आठवड्यात करायचंय. डॉक्टरांनी दोन ते अडीच लाख रुपये खर्च सांगितलंय. मला तुझ्या मदतीची गरज आहे.’’ अश्रूभरल्या डोळ्यांनी संगीताने सांगितले.
‘‘ताई, शेतात काय उत्पन्न मिळतं, हे तर तुला माहितीच आहे. आमचीच कशीबशी हाता-तोंडाची गाठ पडते.’’ अरुणने आपली व्यथा सांगितली.
‘‘दादा, मी एकट्या बाईमाणसानं कोणापुढं पदर पसरायचा. मला तुझ्याशिवाय कोणाचा आधार आहे. तूच जर तोंड फिरवलंस तर मी जाऊ तरी कोठे? लोकांची धुणी-भांडी करून, बळंबळं मी संसार चालवतेय. त्यात सातवीत शिकणाऱ्या पोरीला हृदयाचा आजार झालाय. मी आज ना उद्या तुझे सगळे पैसे परत करीन.’’ संगीताने पदराने डोळे पुसले. मात्र, अरुणने मदतीचे ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे संगीता नाइलाजाने घरी आली. येताना मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला.
वडिलोपार्जित जमिनीवरील सोडचिठ्ठी देण्यासाठी तीन-चार वर्षांपूर्वी अरुण आपल्याकडे किती खेटा मारत होता. किती गोड गोड बोलायचा. मुग्धासाठी कपडे आणि खाऊ घेऊन यायचा. मात्र, जशी आपण तहसील कार्यालयात सोडचिठ्ठीवर सही केली, तेव्हापासून त्याची आपल्यावरील माया पातळ होत गेली. कसलीही मागणी न करता, एका साडीवर समाधान मानल्याचं तिला दुःख होऊ लागलं. आई-वडिलानंतर मुलीचं माहेरपण संपतं, याचा अनुभव ती घेत होती. आई- वडील असते तर त्यांनी काहीही केलं असतं पण आपल्याला रिकाम्या हातांनी परत पाठवलं नसतं, हा विचार तिच्या मनात आल्याने ती रडू लागली. मुग्धाने तिचे डोळे पुसले. ‘‘आई, काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल.’’ मुग्धाचे आधाराचे शब्द ऐकताच, संगीताने तिला छातीशी कवटाळलं.
आठवड्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये मुग्धाचं ऑपरेशन यशस्वी झालं. तिच्या वर्गातील मुलं तिला भेटायला आली होती. त्यांनी वर्गणी काढून, पंचवीस हजार रुपये जमा केले होते. ते पैसे पाहून, संगीताला गलबलून आलं. ‘या लहान लेकरांना कळतंय पण माझ्या सख्ख्या भावाला उमजत नाही,’ ती स्वतःशीच पुटपुटली. दोन दिवसांनी अरुण मुग्धाला बघायला आला. थोडावेळ तिच्याशी बोलून तो निमूटपणे निघून गेला. ‘असला कसला मामा आहेस?’ तो गेल्यावर संगीताने रागाने म्हटले.
दोन लाख रुपये भरल्यानंतर डिस्चार्ज मिळणार होता. त्यामुळे पैशांसाठी संगीताची वणवण सुरू झाली. अनेकांकडे उंबरठे झिजवल्यानंतर पन्नास हजार रुपये जमा झाले होते. ते पैसे घेऊन, ती बिल काऊंटरवर गेली.
‘‘माझ्याकडे पन्नास हजार आहेत. उरलेले पैसे नंतर दिले तर चालतील का? माझ्या मुलीला डिस्चार्ज द्या.’’ संगीताने हात जोडून विनवणी केली. पलीकडील तरुणीने संगणकात पाहून म्हणाली, ‘‘अहो, मुग्धाचं सगळं बिल अरुण वाल्हेकर यांनी भरलंय. डिस्चार्ज मिळाल्यावर, तुम्ही घरी जाऊ शकता.’’ हे शब्द ऐकताच संगीताच्या डोक्यावरील ओझं कमी झालं.
मुग्धाच्या बेडशेजारून तिने अरुणला फोन लावला. ‘‘दाऽऽदाऽऽऽ’’ एवढंच ती म्हणू शकली. अश्रूंचा बांध फुटल्याने तिला बोलणं अवघड झालं.
‘‘ताई, माझ्या लाडक्या भाचीसाठी मी एवढंही करणार नाही का? मी जमीन गहाण ठेवून, दोन लाख रुपये आणलेत. यंदा कांद्याचं पीक जोमदार आहे. तीन महिन्यांत मी जमीन सोडवेन. समजा नाही सोडवली तरी मुग्धाच्या जीवापेक्षा मला जमीन-जुमला प्रिय नाही. तुमच्या दोघींसाठी मी काहीही करीन.’’ अरुणने असं म्हणताच दोघंही बहिण-भाऊ फोनवरच रडायला लागले. आनंदाश्रूंबरोबरच नात्यातील श्रीमंतीही हॉस्पिटलने आज अनुभवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.