पुणे, ता. २६ : मुळशीत होणाऱ्या एका टाउनशिपसाठी (विशेष नगर वसाहत योजना) पवना धरणातून सुमारे दोन टीएमसी, तर भूगाव येथील एका गृहप्रकल्पासाठी तलावातून सुमारे अर्धा टीएमसी पाणीपुरवठा करण्यास राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.
वाढती हद्द आणि लोकसंख्या विचारात घेऊन पुणे शहराच्या पाणी कोट्यात वाढ करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेसह स्वयंसेवी संस्थांकडून होत आहे. मात्र त्यावर अद्याप राज्य सरकारकडून निर्णय झालेला नाही. तसेच ‘पीएमआरडीए’कडूनदेखील हद्दीसाठी पाणी कोट्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
मुळशी तालुक्यातील जांबे, मारुंजी आणि नरे या ठिकाणी टाउनशिप होत आहे. त्यासाठी संबंधित व्यावसायिक बांधकाम कंपनीकडून राज्य सरकारकडे अर्ज करण्यात आला होता. बिगर सिंचनासाठी म्हणजे पिण्याच्या पाण्याचा अथवा औद्योगिक वापरासाठीच्या हक्क प्रस्तावांना मंजुरी देण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळ उपसमितीला आहे. उपसमितीने दाखल अर्ज मंजूर करत या टाउनशिपला पवना धरणातून १.९६६७ टीएमसी पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. त्याबाबतचा आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव न. गौ. बसेर यांनी काढला आहे.
हा कोटा काही अटी-शर्तींवर मंजूर करण्यात आला आहे. त्यात टाउनशिपसाठी पाणी आरक्षण करताना सिंचनाच्या पाण्यात कपात होणार आहे. या कपातीच्या पोटी सिंचनाच्या पुनर्स्थापनेचा खर्च म्हणून प्रतिहेक्टर एक लाख रुपये आणि भाववाढ निर्देशांक विचारात घेऊन येणारी रक्कम अथवा करारनामा करताना राज्य सरकारने जो दर निश्चित केला आहे, त्यानुसार येणारी रक्कम या दोन्ही पैकी जी जास्त रक्कम आहे, ती भरून घेण्याची अट या आदेशात सरकारने घातली आहे. त्याचबरोबरच मुळशी तालुक्यातील भूगाव येथील तलावातून एका गृहप्रकल्पासाठीदेखील पाणी कोटा आरक्षित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
पवना धरणाचा पाणीसाठा
- १०.७६ टीएमसी
-पिंपरी-चिंचवडसाठी मंजूर कोटा- ६.५० टीएमसी
-पिंपरी-चिंचवडला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.